भारतात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी आवर्जून रेल्वे प्रवासाला प्रथम प्राधान्य दिलं जातं. किमान भाडं, सुरक्षितता आणि इतर पर्यायांच्या तुलनेत वेळेत पोहचण्याची हमी असल्याने सर्वांचा कळ हा रेल्वेने प्रवास करण्याकडे असतो. अनेक जण प्रवासाच्या काही महिन्यांआधीच तिकीट बूक करतात. मात्र कधीकधी ऐनवेळेस विविध कारणामुळे प्रवास करावा लागतो. अशात तत्काळ तिकीट काढावं लागतं. तत्काळ तिकीट न मिळाल्यास जनरल डब्बा हाच शेवटचा पर्याय असतो. अतिशय कमी तिकीट आणि ऐन वेळेस प्रवास करण्याची मुभा असल्याने जनरल डब्ब्यात प्रचंड गर्दी असते.
सणासुदीच्या काळात तर जनरल डब्ब्यात पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. जनरल डब्ब्यातील गर्दीमुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यताही असते. अशात प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता भारतीय रेल्वेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नक्कीच जनरल डब्ब्यातील गर्दी कमी होण्यात मदत होईल. भारतीय रेल्वेने नक्की काय निर्णय घेतलाय? हे जाणून घेऊयात.
दररोज 1 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना सुविधा देण्यासाठी नोव्हेंबर 2024 पर्यंत 370 गाड्यांमध्ये 1 हजार जनरल कोच जोडण्यात येणार आहेत. ज्यामुळे जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवासांचा प्रवास सुखकर होण्यात मदत होईल. भारतीय रेल्वेकडून मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अनेक रेल्वे गाड्यांमध्ये 1000 पैकी 583 जनरल कोच जोडण्यात आले आहेत. “तसेच देशभरातील रेल्वेच्या विविध विभागांमधील रेल्वे गाड्यांसह जनरल डब्बे जोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल” अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
8 लाख प्रवाशांना फायदा!
सणासुदीच्या काळात रेल्वेने गावी जाणाऱ्यांची तोबा गर्दी असते. अशात रेल्वे प्रशासनाचीही कसोटी लागते. रेल्वे गाड्यांसह 1 हजार डब्बे जोडले गेल्यास प्रवाशांची गैरसोय टाळली जाईल. तसेचा यामुळे त्यांना दिलासा मिळेल, अशी आशा रेल्वेला आहे. “आम्ही पुढील रंगपंचमीला होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी योजना आखली आहे. तसचे त्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे”, अशी प्रतिक्रिया रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे बोर्डानुसार, पुढील 2 वर्षात 10 हजार नॉन एसी जनरल क्लास जनरल सीटिंग कोच जोडले जाणार आहेत. ज्यामध्ये 6 हजारांपेक्षा अधिक जीएस कोच असतील. तर इतर स्लीपर कोच असतील. ज्यामुळे 8 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल.