इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत पुण्याचे मैदान मारत टीम इंडियाने टी-20 मालिका खिशात घातली.Pudhari File Photo
Published on
:
31 Jan 2025, 6:34 pm
Updated on
:
31 Jan 2025, 6:34 pm
पुणे; सुनील जगताप : इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत पुण्याचे मैदान मारत टीम इंडियाने टी-20 मालिका खिशात घातली. या सामन्यातील विजयाची खास गोष्ट म्हणजे प्लेईंग इलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूंच्या जोरावर भारतीय संघाने सामना जिंकत मालिका खिशात घातली. यासह भारतीय संघाने 2019 पासून घरच्या मैदानात सुरू असलेल्या मालिका विजयाचा सिलसिला कायम राखत सलग 17 वी टी-20 मालिका खिशात घातली. शिवम दुबेच्या जागी बदली खेळाडूच्या रूपात आलेल्या हर्षित राणाने 3 विकेटस् घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. (IND vs ENG)
भारताचा तडाखेबाज फलंदाज हार्दिक पंड्या (53) आणि शिवम दुबे (53)यांची अर्धशतकी खेळी तर रवी बिष्णोई व हर्षित राणा यांनी गोलंदाजी करताना केलेल्या चमत्काराच्या जोरावर भारताने इंग्लंड संघाचा 15 धावांनी पराभव करीत विजय मिळवला. भारताने 5 टी-20 च्या मालिकेमध्ये 3-1 विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली आहे. खराब सुरुवातीनंतर भारताने इंग्लंडला 182 धावांचे लक्ष्य दिले. परंतु चांगल्या सुरुवातीनंतरही इंग्लंडला शेवट चांगला करता आला नाही. त्यांचा डाव 19.4 षटकांत 166 धावांत सुंपष्टात आला.
पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी अर्ध शतकी खेळी केली. डकेटला 39 धावांवर रवी बिष्णोई याने सूर्यकुमार यादव करवी झेलबाद करीत इंग्लंड संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर सॉल्ट याला अक्षर पटेल याने बोल्ड करीत संघाला दुसरा झटका दिला. सामन्याच्या पुढच्या षटकात रवी बिष्णोई याने इंग्लंड संघाचा कर्णधार जॉस बटलर याला केवळ 2 धावांवर झेलबाद बाद करीत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यावेळी संघाच्या 7.3 षटकात 3 बाद केवळ 67 धावा झाल्या होत्या.
यानंतर आलेल्या लियम लिव्हिंगस्टोन याला ही केवळ 9 धावांवर हर्षित राणा याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. राणा हा शिवम दुबेच्या बदली खेळाडू म्हणून संघात आला होता. हॅरी ब्रूकने 26 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारासह 51 धावांची खेळी केली. त्याला वरुण चक्रवर्ती याने अर्शदीप सिंगकरवी झेलबाद करीत इंग्लंडच्या धावांची गती कमी केली. त्यानंतर वरुणने त्याच षटकात ब्रायडन कारर्से याला बाद केले. जेकब बेथिल्ल हा 6 धावांवर बाद झाला. संथ गतीने खेळणार्या इंग्लंड संघाच्या फलंदाजांना रवी बिष्णोई याने आणखी एक धक्का देत संघाला विजयाच्या दिशेने नेले. (IND vs ENG)
तत्पूर्वी, भारत- इंग्लंड यांच्यातील टी-20 क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने 181 धावा करत इंग्लंड संघासमोर चांगले आव्हान ठेवले होते. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागल्यानंतर भारताचे फलंदाज मैदानात उतरले. भारताला पहिला धक्का साकिब महमूदने दिला. त्याने संजू सॅमसनला आऊट केले. विकेटकीपर फलंदाज फक्त एक धाव काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. मालिकेतील पहिला सामना खेळणार्या साकिब महमूदने दुसर्या षटकात संजू सॅमसन (1), तिलक वर्मा (0) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (0) यांचे बळी घेतले. यानंतर रिंकू सिंग आणि अभिषेक शर्मा यांनी पदभार स्वीकारला. हे दोघे बाद झाल्यावर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी डाव सावरताना दमदार फलंदाजी करीत संघाला चांगल्या स्थितीत आणले. हार्दिकने अर्धशतकी खेळी करताना 30 चेंडूत 4 चौकार आणि चार षटकारासह 53 धावांची दमदार खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली.