संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी जबरदस्त खेळी केली.File Photo
Published on
:
15 Nov 2024, 8:42 pm
Updated on
:
15 Nov 2024, 8:42 pm
पुढारी वृत्तसेवा : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी (IND vs SA) झळकावलेल्या तडाखेबंद शतकांच्या जोरावर टीम इंडियाने २८३ धावांचा डोंगर उभारला. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध या दोघांनी शतकं झळकवतानाच दुसऱ्या विकेटसाठी ८६ चेंडूत नाबाद २१० धावांची अविश्वसनीय भागीदारी केली. या दोघांनी नाबाद शतकी खेळी करत अनेक इतिहास रचले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी-20 मालिकेतील शेवटचा आणि चौथा सामना जोहान्सबर्गमधील द वाँडरर्स स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी विक्रमांचा एव्हरेस्ट उभा केला.
* या सामन्यात भारतीय फलंदाजांनी एकूण 23 षटकार मारून यापूर्वी असलेला 22 षटकारांचा विक्रम मागे टाकला. यामध्ये तिलक वर्माने 10, संजू सॅमसनने 9 तर अभिषेक शर्माने 4 षटकार मारले.
* संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारताकडून सर्वोच्च भागीदारी केली. संजू सॅमसनने 28 चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले होते. तसेच त्यानंतर तिलकनेही 22 चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. (IND vs SA)
* या दोघांनी अर्धशतकानंतरही आक्रमक खेळ सुरूच ठेवला होता. त्यानंतर 51 चेंडूंतच संजू सॅमसनने आधी शतक पूर्ण केले. त्यामुळे तो एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतक ठोकणारा पहिलाच खेळाडू ठरला. त्यानंतर तिलकने 41 चेंडूंत शतक ठोकले. हे त्याचे सलग दुसरे आंतरराष्ट्रीय टी-20 शतक आहे. त्यामुळे तो सलग दोन आंतरराष्ट्रीय टी-20 शतक करणारा सॅमसननंतरचा दुसराच भारतीय खेळाडू ठरला.
* भारतीय क्रिकेट संघाच्या तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात दमदार शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे सलग दुसरे शतक ठरले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी त्याने सेंच्युरियनच्या मैदानावर नाबाद 107 धावांची खेळी केली होती. (IND vs SA)
* सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्यात दुसर्या विकेटसाठी 210 धावांची विक्रमी भागीदारी झाली. या शतकी खेळीसह तिलकने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 शतके झळकावण्याच्या बाबतीत, तो रोहित शर्मा (5), सूर्यकुमार (4), सॅमसन (3) आणि राहुल (2) यांच्या मागे आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये भारतासाठी सर्वोच्च भागीदारी
210*- संजू सॅमसन आणि तिलक वर्मा वि. दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2024
190 - रिंकू सिंग आणि रोहित शर्मा वि. अफगाणिस्तान, बंगळूर, 2024
176 - दीपक हुडा आणि संजू सॅमसन वि. आयर्लंड, डब्लिन, 2022
173 - संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव वि. बांगला देश, हैदराबाद, 2024
165 - के. एल. राहुल आणि रोहित शर्मा वि. श्रीलंका, इंदूर, 2017
165 - यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल वि. झिम्बाब्वे, हरारे, 2024