विधानसभा निवडणुकीनंतर नव्या सरकारच्या नेतृत्वाखालील नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा शिवतीर्थावर होणार की राजभवनावर होणार यावर सध्या राज्याच्या राजशिष्टाचार विभागात मोठा खल सुरू आहे.
विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असली तरी निवडणुका झाल्यावर नव्या सरकारची स्थापना, शपथविधी आणि डिसेंबर महिन्यातील नागपूरचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी विविध शासकीय विभागांचे पडद्यामागून काम सुरू आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी तर एका महिन्यापूर्वीच सुरू झाली आहे. अधिवेशनासाठी विविध विभागाची वाहने ताब्यात घेण्यापासून रंगरंगोटी व इतर प्रशासकीय कामे सुरू झालेली आहेत. त्यापूर्वी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. त्याचीही तयारी सुरू झाली आहे.
आता राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. 23 तारखेला मतमोजणी होईल. त्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होईल. त्यावेळी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. पण नव्या सरकारचा शपथविधी शिवाजी पार्कवर होईल, राजभवनावर होईल की वानखेडे स्टेडियमवर होईल याचा अंदाज सरकारी अधिकाऱयांना नाही.
n नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याबाबत राजभवनाचा कानोसा घेतला तेव्हा राजभवनावर फार मोठी हालचाल सुरू नसल्याचे समजले. राजभवनावरील दरबार हॉलमध्ये सर्वसाधारणपणे शपथविधी सोहळा पार पडतो. पण दरबार हॉलची क्षमता अडीचशे ते तीनशे खुर्च्यांची आहे. दरबार हॉल शपथविधी सोहळ्यासाठी तयार करता येईल. पण या हॉलची क्षमता तुलनेत कमी असल्यामुळे सध्या नेते मैदान किंवा स्टेडियमला प्राधान्य देतात, असे राजभवनावरील सूत्रांनी सांगितले.
n राज्याच्या राजशिष्टाचार विभागातील सूत्रांच्या मते कुठे शपथविधी सोहळा होणार हे पूर्वनियोजित नसते. नव्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश येतील. तसे आम्ही शपथविधी सोहळ्याचे नियोजन करू असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे नक्की कुठे शपथविधी सोहळा होईल याचा अंदाज अद्याप राजशिष्टाचार विभागाला नाही.