नरडवे ः मतदारांशी संवाद साधताना नितेश राणे. सोबत गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, सरपंच गणपत ऊर्फ बाबू सावंत व अन्य.pudhari photo
Published on
:
16 Nov 2024, 1:05 am
Updated on
:
16 Nov 2024, 1:05 am
कणकवली ः कणकवली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी जि. प. नाटळ मतदारसंघाचा प्रचार दौरा केला. या दौर्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जि. प. चे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांनी सांगितले. दौर्या दरम्यान मतदारसंघातील उबाठाच्या काही कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
नितेश राणे यांनी नाटळ मतदारसंघातील नरडवे, दिगवळे, दारिस्ते, शिवडाव, कुंभवडे, सांगवे आदी गावांमध्ये प्रचाराची फेरी पूर्ण केली. प्रत्येक गावामध्ये सभा घेत त्यांनी मतदारांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला. गावागावात झालेली विकासकामे व प्रलंबित कामे यांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच गावाच्या विकासाबाबत मतदारांच्या असलेल्या अपेक्षाही त्यांनी जाणून घेतल्या.
खासदार नारायण राणे यांनीही नाटळ मतदारसंघाला विकासकामांबाबत नेहमीच झुकते माप दिले. आपणही या मतदारसंघासाठी आतापर्यंत कोट्यवधीचा निधी दिला आहे. यापुढेही मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सदैव तुमच्यासोबत असल्याचे नीतेश राणे यांनी मतदारांना सांगितले. गेली अनेक वर्षे रखडलेले नरडवे धरण प्राधान्याने पूर्ण करण्याबरोबरच दिगवळे, नाटळ व कुंभवडे या गावांमध्ये मंजूर लघु धरणांची कामे सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.(Maharashtra assembly poll)
गोट्या सावंत म्हणाले, नाटळ मतदारसंघ हा जिल्ह्यातील एक विकसित मतदारसंघ आहे. याचे सर्व श्रेय खा. नारायण राणे व आ. नितेश राणे यांना आहे. गेली 25 वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करताना मतदारसंघातील प्रत्येक गावाला व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. आपण आतापर्यंत जशी साथ मला व राणे कुटुंबियांना दिली अशीच साथ यापुढेही कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार दौर्यात सहभागी झाले होते.