राज्यात परिवर्तन करून भाजपला उखडून फेकायचेय; संजय राऊतांची टीकाPudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 3:10 am
Updated on
:
16 Nov 2024, 3:10 am
Pune Politics: महाराष्ट्राला बेइमानीचा डाग लागला आहे. निवडणुकीत हा डाग पुसावा लागणार आहे. यापुढे महायुतीचे 50 खोक्यांचे राजकारण चालणार नाही. राज्यात परिवर्तन करून भाजपला उखडून फेकायचे असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील गोखलेनगर येथे घेण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत. या वेळी माजी महापौर अंकुश काकडे, काँग्रेस नेते मोहन जोशी, दीप्ती चवधारी, अभय छाजेड, नीलेश निकम, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, शहरप्रमुख गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, ईडीच्या भीतीने सर्व नेते भाजपने आपल्या पक्षात घेतले. एकनाथ शिंदे, अजित पवार डरपोक असून, ते ईडीच्या कारवाईला घाबरून पाप लपविण्यासाठी पळून गेले आहेत. कारवाई आमच्यावर झाली, आम्ही तुरुंगात गेलो. कर नाही त्याला डर नाही. याच देशात स्वातंत्र्य टिकवायचे असेल, तर आमच्यासारख्यांना तुरुंगात जावे लागेल. राज्यात 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर 26 तारखेला महाविकास आघाडीचे राज्य येईल, त्यानंतर सहा महिन्यांत नरेंद्र मोदी सत्तेवर नसतील.
महाराष्ट्राचे दोन दुश्मन हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. त्यांना आपल्या राज्याचा विकास झालेला नकोय. मराठी माणसाचा विकास नको आहे. राज्यातील मराठी बांधवांना उद्योग आणि रोजगार देऊ शकेल असे सर्व उद्योगधंदे गुजरातला नेऊन त्यांनी राज्याला कंगाल केल्याचा आरोप राऊत यांनी केला.
यासारखे दुर्दैव नाही - राऊत
जिथे आम्ही लाखांची सभा घेतो, तिथे 5 हजार लोकही नव्हते. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा झाली. त्या सभेला गर्दी नव्हती. ज्या ऐतिहासिक मैदानावर शिवसेनेची स्थापना झाली. महाराष्ट्राची स्थापना झाली. तिथे झालेल्या मोंदीच्या सभेस अवघे 5 हजार लोकसुद्धा नव्हते. जिथे आम्ही एक लाखाच्या सभा घेतो, तिथे देशाच्या पंतप्रधानांना रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावे लागले, यासारखे दुर्दैव नसल्याची टीका राऊत यांनी केली.