Maharashtra Legislative Assembly
Published on
:
16 Nov 2024, 5:30 am
Updated on
:
16 Nov 2024, 5:30 am
प्रकाश गायकवाड, कोरेगाव
सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वांत लक्षवेधी लढत होत आहे ती कोरेगाव मतदारसंघात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश शिंदे बाजी मारणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांचे कट्टर समर्थक शशिकांत शिंदे बाजीगर ठरणार याविषयी संपूर्ण राज्यात उत्सुकता आहे. कोरेगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुन्हा एकदा आ. महेश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. महेश शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात उभा केला. प्रत्येक वाडी-वस्तीवर कोट्यवधी रुपयांचा निधी आणून आ. महेश शिंदे यांनी मतदारसंघात वातावरण निर्मिती केली. प्रतिस्पर्धी उमेदवार असणार्या शशिकांत शिंदे यांच्या अनेक सहकार्यांचा स्वत:च्या पक्षात प्रवेश घडवून आणत आ. महेश शिंदे यांनी स्वत:ची बाजू मजबूत केली. सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून महेश शिंदे यांनी प्रचारकाळात मतदारसंघात जे जे केले त्याचा लेखा-जोखा लोकांसमोर मांडला आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी खा. उदयनराजेंसाठी कोरेगाव मतदारसंघातून लीड मिळवून दिले. त्यामुळे आ. महेश शिंदे विकासकामांच्या जोरावर लोकांसमोर गेले आहेत. आ. शशिकांत शिंदे गेल्या विधानसभा निवडणुकीत जरी पराभूत झाले तरी ते खचले नाहीत. पराभवाच्या दिवसांपासून ते लोकांमध्ये गेले.
लोकसभेला शरद पवार यांच्या इच्छेखातर त्यांनी सातार्याची लोकसभा लढवली. केवळ निसटत्या फरकाने ते पराभूत झाले. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही, निष्ठा सोडली नाही. अनेक ऑफर नाकारून आ. शशिकांत शिंदे शरद पवारांसोबत राहिले. विधान परिषदेचे आमदार असतानाही त्यांनी विकासकामेही आणली. काही लोक त्यांना सोडून गेले मात्र त्याचवेळी आ. महेश शिंदे यांच्या गटातील लोकांचेही त्यांनी पक्षप्रवेश घडवून आणत बाजी पलटवून लावली. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या गटातही ऐन प्रचार काळात इनकमिंग सुरू झाले. सौम्य बोलणे, लोकांचा आदर करून वागणे ही शशिकांत शिंदे यांची जमेची बाजू आहे. त्या जोरावर शरद पवारांच्या आशीर्वादावर ते पुन्हा एकदा विधानसभेला लोकांसमोर जात आहेत. मुळातच लोकसभेला कोरेगाव मतदारसंघातील फरकही काठावर आहे. त्यामुळे विधानसभेलाही ही लढाई काठावरची झाली आहे.
कोरेगावमध्ये निवडून शिंदेच येणार पण कोणते शिंदे? महेश शिंदे की शशिकांत शिंदे याची उत्सुकता राज्याला आहे. कारण ही लढाई ‘मास’ आणि ‘मसल पावर’ असणार्या बलाढ्य नेत्यांमध्ये आहे. त्यामुळेच या हायव्होल्टेज लढाईकडे राज्याचे लक्ष आहे.