आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखलfile photo
Published on
:
16 Nov 2024, 7:33 am
Updated on
:
16 Nov 2024, 7:33 am
परवानगी न घेता वाहनावरील ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार
राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपक वाजविण्याची कोणतीही परवानगी घेतलेली नसताना व वाहन चालवत नेत कर्कश आवाजात ध्वनिक्षेपक वाजविल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून एका जणाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, हेड कॉन्स्टेबल परदेशी, पोलिस कॉन्स्टेबल अजिनाथ आंधळे, अमोल गायकवाड यांचे पथक सरकारी शहरात पेट्रोलिंग करत होते. त्या वेळी मोरगे वस्ती, वाई नं 7 येथे एका वाहनावर (एमएच 17 टी 4776) राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार लहू नाथा कानडे यांच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपक वाजविला जात होता. मात्र त्या वाहनाचा चालक सत्यवान जगन्नाथ करंकाय याच्याकडे त्यासाठीची कोणतीही परवानगी नव्हती. तरीही तो वाहन चालवत कर्कश आवाजात ध्वनिक्षेपकावरून प्रचार करत होता, असे पथकाच्या लक्षात आले. त्यावरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंद्यातील उमेदवाराच्या पुत्राकडे सापडले दोन लाख
कोतवाली पोलिसांनी नगर-पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौकात शुक्रवारी मध्यरात्री (दि. 15) रात्री आलिशान मोटारकारमध्ये प्रवास करणार्या चौघांना पकडले. त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड जप्त केली. महागडी मोटारकार व चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, रोकड पडताळणीसाठी समितीच्या ताब्यात देण्यात आली. आलिशान मोटारीत प्रवास करणारा तरुण श्रीगोंदा मतदारसंघातील एका उमेदवाराचा पुत्र असून अन्य तरुण त्याचे मित्र असल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिस ठाण्याचे पथक नगर-पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एका महागड्या मोटारीत चार तरुण प्रवास करीत असताना आढळून आले.
तपासणीत त्यांच्याकडे सुमारे दोन लाखांची रोकड आढळून आली. त्याबाबत समाधानकारक उत्तरे त्यांना देता आली नाहीत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आचारसंहिता काळात 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम ने-आण करण्यास बंदी आहे. त्यामुळे या रक्कमेचा पंचनामा करून ती जप्त करण्यात आली. मोटारीसह त्या चौघांना पोलिस ठाण्यात आणून तशी नोंद घेण्यात आली. पुढील कारवाई पडताळणी समिती करीत आहे.
ही कारवाई शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक शीतल मुगडे, उपनिरीक्षक सेंदवाड यांच्या पथकाने केली.
सोशल मीडिया ग्रुपच्या सदस्याविरुद्ध गुन्हा
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून ‘जिल्हा ग्राहक सुरक्षा’ या नावाने असलेल्या सोशल मीडिया ग्रुपच्या सदस्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संबंधित ग्रुपवर शुक्रवारी (दि. 15) एका सदस्याने एक मेसेज टाकला. त्यात लिहिले होते- ‘विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा निरोप आहे. ज्यांची नावे मतदार यादीतून डिलीट झाली आहेत म्हणजे यादीत नावावर डिलीट असा शिक्का लागला आहे. ते लोक मतदान केंद्रावर फॉर्म नंबर 17 भरून आणि आपले वोटिंग कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. तरी विनंती आहे, की ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत, त्यांनी मतदान केंद्रावर येऊन प्रोसिजर फॉलो करावी व मतदानाचा हक्क बजावावा.’ हा संदेश खोटा असून, मतदानावर व मतदान यंत्रणेवर परिणाम करणारा आहे. याबाबत सहायक निवडणूक अधिकारी विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधित ग्रुपमधील त्या सदस्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कोणीही खोटी माहिती प्रसारित करू नये असे आवाहन तोफखाना पोलिसांनी केले आहे.