देवळा : परिसरात सुरू असलेली उन्हाळी कांद्याची लागवड. (छाया : सोमनाथ जगताप)
Published on
:
16 Nov 2024, 9:20 am
Updated on
:
16 Nov 2024, 9:20 am
देवळा : ‘पाणी आहे, भाव आहे पण अपेक्षित माल निघत नाही’ अशी गत लाल कांद्याची झाली आहे. मागील उन्हाळी कांदा संपला आहे. पोळ व लाल कांद्याचे पीक खराब झाले आहे, तर उन्हाळी कांद्यासाठी रोप तयार करण्यात अडचणी येत असल्याने यंदा पाणी असूनही कांद्याचे पीक घेणे अवघड झाले आहे.
कसमादे भागात परतीच्या पावसाने सर्वदूर पाणीच पाणी करून दिले असले, तरी कांदा पिकाला अडथळ्याची शर्यत करावी लागत आहे. या भागात तीन टप्प्यांत कांदा पीक घेतले जाते. पोळ्याच्या टप्प्यात लागवड केली जाते तो पोळ कांदा, दिवाळीच्या पूर्वार्धात लाल व दिवाळीनंतर उन्हाळी कांदा लावला जातो. परंतु यंदा अवकाळी पावसाने या तिन्ही सिझनच्या कांद्याला फटका बसला आहे. पोळ कांदा काढणीवर आलेला असताना व लाल कांद्याची लागवड झालेली असतानाच परतीच्या पावसाने धडाका लावल्याने करपा होऊन हे कांद्याचे पीक शेतातच खराब झाले. जादा पाणी, दव, धुके यामुळे कांद्याची पात खराब होऊन कांद्याची वाढ खुंटली. या दरम्यान उन्हाळ कांद्याचे रोप तयार करण्यासाठी शेतकर्यांनी उळे टाकले परंतु या पावसामुळे तेही मरून गेले. अक्षरशः तीन, तीन वेळा उळे टाकण्याची वेळ शेतकर्यांवर आली. उन्हाळी कांद्याचे रोप उशिरा तयार होणार असल्याने या कांद्याची लागवड लांबणार आहे. कांद्याला भाव असल्याने सर्वच शेतकरी कांदा पीक घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु असे अडथळे येत असल्याने कांद्याचे पीक घेण्यास मर्यादा येत आहेत.
कांदा हे नगदी पीक असून, या भागातील शेतकर्यांचे ते हक्काचे पीक असते. परंतु यंदा अवकाळी पावसाने कांद्याचे गणित बिघडले आहे. लाल कांदा ही गेला आणि कांद्याचे रोप तयार करताना अनंत अडचणी येत आहेत. यामुळे कांद्याचे उत्पन्न घेणे अवघड झाले आहे.
भगवान जाधव, जिल्हा समन्वयक, कांदा उत्पादक शेतकरी संघटना, नाशिक.