Published on
:
16 Nov 2024, 11:16 am
Updated on
:
16 Nov 2024, 11:16 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: प्रचार रॅली म्हटले की, उमेदवारांच्या मागे पुढे कार्यकर्ते पदाधिकार्यांचा गराडा, तसेच विविध आश्वासनांची खैरात करत रिक्षातील भोंगा उमेदवारांच्या पुढे असे काही चित्र सर्वच दिसत आहे. परंतु याला अपवाद पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ठरले आहेत. त्यांनी शुक्रवारी (दि. १५) न्यू हनुमाननगरात हटके रॅली काढली. या रॅलीत केवळ काँग्रेसचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते.
रॅलीची माहिती मित्र पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकत्यांना माहिती नसल्याने ते रॅलीत सहभागी झालेच नाहीत. या हटके प्रचार रॅलीची परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगतदार वळणावर आला आहे. प्रमुख पक्षांसह अपक्षही प्रचारात आघाडी घेत आहेत. मात्र कॉंग्रेस व त्यांचे मित्र पक्ष कोणत्याच आघाडीवर नाहीत.
प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा आवधी उरला असतानाही त्यांचा प्रचार रंगतदार वळणावर आला नसल्याचे शुक्रवारी न्यू हनुमाननगरातील रॅलीवरून दिसून आले. शुक्रवारी सकाळीच महाविकास आघाडीचे उमेदवार लहू शेवाळे न्यू हनुमाननगरात प्रचार रॅलीसाठी आले होते. उमेदवारांसोबत आठ ते दहा काँग्रेसचे पदाधिकारी, त्यांच्या हातात विविध घोषणांचे बॅनर त्यांच्यासमोर उमेदवारांचे गुणगाण करणारे कॅसेट वाजवत रिक्षा चालला होता. महाविकास आघाडीची रॅली असल्याने या रॅलीत मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असणे गरजेचे होते. परंतु या रॅलीत मित्र पक्षांचा एकही स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ता सहभागी नव्हता.
अचानक रॅली
महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या पदधिकारी, कार्यकत्यांचा कानोसा घेतला असत त्यांना शुक्रवारी या भागात रॅली असल्याची कोणताच निरोप आला नव्हता. विशेष म्हणजे उमेदवार हनुमाननगरात दाखल झाल्याचीही माहिती रॅली संपेपर्यंत मित्र पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.
मित्र पक्षाविनाच प्रचारफेरी
दरम्यान, या रॅलीची मित्र पक्षांना माहिती नसल्याने त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे शेवाळे यांनी उपस्थित १० ते १२ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतच रॅली आटोपती घेतली. विशेष म्हणजे या भागातील काँग्रेसच्या जुन्या जाणत्या पदाधिकार्यांनाही या रॅलीची कल्पना नव्हती, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हटके रॅलीची दिवसभर हनुमाननगरात चर्चा सुरू होती.