Published on
:
16 Nov 2024, 1:32 pm
Updated on
:
16 Nov 2024, 1:32 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्रकारांना पगार घेऊन मुलांचे शिक्षण करायचे आहे. त्यांना पोटाची भूक भागवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना पगार हवा असल्याने त्यांना व्यवस्थापनाचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत’, अशी टीका लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमरावतीमधील जाहीर सभेत बोलताना केली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या टीकेचा महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे राहुल गांधी यांची आज (दि.१६) जाहीर सभा झाली. या सभेत मोदी यांच्यावर टीका करताना राहुल यांनी माध्यमांनाच लक्ष्य केले. ते म्हणाले, " मी मागील एक वर्षापासून संविधान, जातनिहाय जनगणना आणि आरक्षण मर्यादा वाढवा, अशी मागणी करत आहे. माध्यम हे दाखवत नाही. हे सर्व त्यांचेच आहेत. हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे सर्व माझ्याकडे पाहून हसतात. आम्ही त्यांचेच असल्याचे सांगत हसतात. तुमचे नाहीच, असेही सांगतात. त्यांची चूक नाही. हे मला आवडताते पण, त्यांना पगार घ्यायचा आहे. मुलांचे शिक्षण करायचे आहे. त्यांच्या पोटाची भूक शमवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना व्यवस्थापनाचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने पत्रकार गुलाम आहेत."
महाराष्ट्र संपादक परिषदेकडून राहुल गांधी यांचा निषेध
आपण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहात.आपण सत्ताधाऱ्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करणे अपेक्षित आहे.मात्र आपण पत्रकारांविरुद्धचा आवाज उठवत आहात, त्यांना गुलाम म्हणत आहात. वर्षानुवर्षे निष्ठेने आपली लेखणी जिझवणाऱ्या तमाम पत्रकारांचा हा जाहीर अपमान आहे, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला. समाजाच्या समस्या चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यापेक्षा आपण प्रत्येक सभेत पत्रकारांना गुलाम म्हणता. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पत्रकार आपल्या या विधानाने कमालीचे दुखावलेले आहेत. राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करायची कसे बोलायचे हा तुमचा अधिकार आहे पण तुमच्या व कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी घेणेदेणे नसणाऱ्या पत्रकारांचा असा जाहीरपणे पाणउतारा करणे योग्य नाही, असेही प्रकाश कुलथे यांनी म्हटले आहे.