Published on
:
16 Nov 2024, 3:29 pm
Updated on
:
16 Nov 2024, 3:29 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Trophy Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाच्या ताफ्यात दुखापतीचे ग्रहण लागले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरला पर्थच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
या सामन्याआधी भारतीय संघातील आणखी एक खेळाडू शुभमन गिलला दुखापत झाली आहे. या आधी लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर आली होती. त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे.
गिल याला सराव सामन्यावेळी हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. स्लिपमध्ये कॅच पकडताना चेंडूचा जबरदस्त मार बसल्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळणे मुश्किल वाटत आहे. जर तो सामन्याला मुकला तर टीम इंडियाचे टेन्शन आणखी वाढणार, यात शंका नाही.
ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी सरावाला सुरुवात केल्यावर भारतीय ताफ्यातील खेळाडूंना दुखापतीने घेरल्याचे चित्र निर्माण झाले होते. लोकेश राहुलने चेंडू लागल्यावर मैदान सोडल्याचा प्रकार घडला. सर्फराज खानही दुखापतीचा सामना करत आहे, अशी चर्चाही रंगली. एवढेच नाही, तर विराट कोहली स्कॅनिंगसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्याचे वृत्तही ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिले होते.
एका बाजूला या खेळाडूंची दुखापत किरकोळ असल्याच्या गोष्टीमुळे थोडासा दिलासा मिळत असताना स्टार बॅटस्मनची दुखापत टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारी आहे.