प्रियांका गांधी काँग्रेस उमेदवारांसाठी सभा घेणारा आहेत. File Photo
Published on
:
16 Nov 2024, 5:03 pm
Updated on
:
16 Nov 2024, 5:03 pm
नागपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभापाठोपाठ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा आपल्या उमेदवारांसाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या विदर्भ दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यातील जाहीर सभेसोबत पश्चिम नागपुरचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ ‘रोड-शो’ करणार आहेत. अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत त्या जनतेचे आशीर्वाद मागणार असून ठिकठिकाणी स्वागताची तयारी आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शेवटच्या टप्प्यात विदर्भात लक्ष ठेवून आहेत. अशावेळी काँग्रेसकडून राहुल आणि प्रियंका गांधी यांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रियंका गांधींच्या या दौऱ्याने महाविकास आघाडीसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची माहिती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली. प्रियंका गांधी पहिल्यांदाच पश्चिम नागपुरच्या जनतेसोबत संवाद साधत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम नागपूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
आजवर निवडणुकीत इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांचा पश्चिममध्ये प्रचाराच्या निमित्ताने दौरा झाला असला, तरी प्रियंका गांधी प्रथमच येत आहेत. पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ‘रोड-शो’ हा पुढे मध्य नागपुरात काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्यासाठी गांधी गेट चौक ते कोतवाली पोलीस स्टेशन मार्गे बडकस चौकापर्यंत होणार आहे. यानिमित्ताने प्रियांका गांधी थेट संघ मुख्यालय परिसरात येत आहेत. साहजिकच या दौऱ्यासाठी काँग्रेस जोमाने कामाला लागली आहे.