Published on
:
16 Nov 2024, 1:32 pm
Updated on
:
16 Nov 2024, 1:32 pm
डोंबिवली : येत्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक मतदार प्रक्रिया महाराष्ट्रभर पार पडणार आहे. 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान ड्राय-डे जाहीर केला आहे. दारूसह अंमली पदार्थांचा साठा जमा करण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. असाच गांजाचा मोठा साठा क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने कारवाई करून पकडला आहे. कल्याण पूर्वेकडील पूना लिंक रोडला क्राईम ब्रँचने लावलेल्या सापळ्यात तिघे अडकले आहेत. या त्रिकुटाकडून तब्बल 24 किलो 962 ग्रॅम वजनाचा 5 लाख 20 हजार रूपये किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
गणेश विवेक जमखंडी (26, रा. विनायक कॉलनी, खडेगोळवली कल्याण-पूर्व), अमीर सलीम शेख (28, रा. जय अंबे कॉलनी, कोळसेवाडी कल्याण-पूर्व) आणि राज रवी पटेल (26, रा. लक्ष्मी पुनम अपार्टमेंट, सरगम गल्ली खडेगोकळली, कल्याण-पूर्व) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूना लिंक रोडला असलेल्या विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनबाहेर काही लोक गांजाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती खासगी गुप्तहेरांकडून मिथुन राठोड यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक निरीक्षक संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक विनोद पाटील, जमादार अशोक पवार, विलास कडू, सुधीर कदम, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनावणे, गोरखनाथ पोटे या पथकाने जाळे पसरले होते. दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर तिघेजण प्रवासी बॅगांसह श्रीराम चौकात रिक्षातून उतरून अपर्णा डेअरीकडे येत असताना दिसले. पथकाने तात्काळ झडप घालून तिघांना ताब्यात घेतले.
बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. या त्रिकुटाने गांजाचा इतका मोठा साठा ओडिसा राज्यातून विकत आणून कल्याण आणि उल्हासनगर परिसरात वितरीत अर्थात विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली या त्रिकुटाने दिली. या प्रकरणी तिन्ही इसमांविरूध्द कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अर्थात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8 (क), 20 (ब), 29, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.