एका व्हॅनमधून निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने ५ कोटी ५५ लाखांची रक्कम जप्त केली.Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 1:35 pm
Updated on
:
16 Nov 2024, 1:35 pm
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना हव्या असलेल्या वस्तू, पार्ट्या आणि पैशांची रसद पुरवली जात असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सतर्क झाला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कल्याण-शिळ महामार्गावर शनिवारी सकाळच्या सुमारास निवडणूक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली. एका व्हॅनमधून निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने ५ कोटी ५५ लाखांची रक्कम जप्त केली.
१० लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्याने ही रक्कम अधिक चौकशीसाठी प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली असल्याची माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.कल्याण-शिळ महामार्ग परिसरात स्थिर सर्वेक्षण विभागाचे एक पथक कार्यरत आहे. हे पथक शनिवारी सकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. हे पथक एका व्हॅनची तपासणी करत असताना त्या व्हॅनमध्ये ५०० च्या नोटांची मोठ्या प्रमाणात रक्कम आढळली. या रकमेची मोजणी केल्यावर ही रक्कम ५ कोटी ५५ लाख रूपये आढळून आली. पथकाने सदर व्हॅन बाजूला घेऊन रकमेबाबत अधिकृत कागदपत्रांची संबंधीत व्हॅनमधील व्यक्तींकडे चौकशी केली. मात्र या रकमेबाबत व्हॅनमधील कुणीही अधिकृत माहिती निवडणूक पथकाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे पथकाने ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांना कळवली.
व्हॅनमधील रक्कम संशयास्पद असल्याने ही माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. पंचांसमक्ष या रक्कमेचा पंचनामा करून प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतली. निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात उलाढाली होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाच्या पथकांनी वाहनांच्या तपासणी मोहिमेला वेग दिला आहे. व्हॅनमध्ये सापडलेली रक्कम लोखंडी ट्रंकांमध्ये आढळून आल्याने संशय बळावला आहे. मतदारांना आकर्षित करण्याकरिता दारू, पार्ट्या, गृहोपयोगी वस्तू, रक्कम, आदींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम हाती लागल्याने ही रक्कम कुणी, कुठून आणि कशासाठी आणली होती ? याचा चौकस तपास सुरू करण्यात आला आहे.