Published on
:
16 Nov 2024, 3:12 pm
Updated on
:
16 Nov 2024, 3:12 pm
कसारा : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गांवरील शहापूर ते कसारा या दरम्यानचा रस्ता अध्याप सुरु झालेला नाही काही महत्वाचे काम सुरु असल्याने अध्याप हा समृद्धी महामार्ग वरील एक टप्पा अध्याप सुरु झाला नाही. बंद असलेल्या समृद्धी महामार्गावरील गोलभण पुलाखाली आज एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
समृद्धी महामार्गांवरील गोलभण पुलाच्या खाली तब्बल ५०० फूट खाली ह्या महिलेचा मृतदेह मिळाला. सदर महिलेचा मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत होता. डोक्याला गभीर दुखापत झालेली असून हात पाय मोडलेले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत विभागीय पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील बच्छाव ,यांनी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.
मृतदेह ५०० फूट उंचीवरील पुलावरून खाली फेकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घटनास्थळी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पल्लवी आखाडे यांनी शवविच्छेदन करून पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली. समृद्धी महामार्ग बंद असताना देखील संशयस्पद मृतदेह महामार्गावरील पुलाखाली सापडल्याने समृद्धी महामार्गावरील सुरक्षा ऐरणीवर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस.स्वामी, विभागीय पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव हे पुढील तपास करीत आहेत.