मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आपल्या या मागणीवर ते ठाम आहेत. दुसरीकडे मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मात्र या मागणीला जोरदार विरोध केला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार देणार असल्याची घोषणा देखील केली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे.
आपला निर्णय मागे घेताना मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, मराठा बांधवांनी ज्याला पाडायचं आहे त्याला पाडावे, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणावे. फक्त कोणताही निर्णय घेत असताना मराठा आरक्षण डोक्यात ठेवावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध केल्यानं आता संपूर्ण राज्याचं लक्ष हे येवला विधानसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. आज मनोज जरांगे पाटील हे येवल्याच्या दौऱ्यावर आहेत.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही. मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्या पाडा. सांत्वन पर भेट आहे. आता रस्त्यात गाव आहे. ते बाजूला सारू का? कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही, मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा, आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष? असं म्हणत त्यांनी यावेळी छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, येवल्यात विशेष काही नाही, येवला काही राज्याच्या बाहेर नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक अस काही नाही. मी ठरवले तर डायरेक्ट कार्यक्रमच करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. तो सारखा सारखा बिघडतो. त्यामुळे नवा हातात घेतला, माईकचे उदाहरण देत त्यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.