मनोज जरांगे यांनी वैजापूर येथे ‘पुढारी न्यूज’च्या प्रतिनिधीशी संवाद साधला.file photo
Published on
:
16 Nov 2024, 1:14 pm
Updated on
:
16 Nov 2024, 1:14 pm
वैजापूर : ‘जे लोकसभेला सांगितलं होतं, तेच विधानसभेला सांगतोय की पाडा,’ असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले आहे. ‘माझ्या नावाचा, फोटोचा वापर करून कुणी मत मागत असेल तर माझा नाईलाज आहे,’ असेही ते म्हणाले. जरांगे आज (दि. 16) येवला दौऱ्या होते. यावेळी त्यांनी वैजापूर येथे ‘पुढारी न्यूज’च्या प्रतिनिधीशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून वैजापूर मतदारसंघात जरांगे यांच्या नावाचा वापर करून काही नेते राजकीय भांडवल करत असल्याचे समोर आले होते. यावर जरांगे पाटील यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘जे मी लोकसभेला सांगितलं होते तेच विधानभेला सांगतोय की पाडा म्हणून. राज्यात कुणालाही पाठींबा नसून काही लोक बळजबरीने माझ्या नावाचा, फोटोचा वापर करत आहेत, पण त्याला माझा नाईलाज आहे, असा खुलासा जरांगे यांनी केला. (Maharashtra assembly poll)
‘मला राजकारणापेक्षा माझ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कुणी माझे कितीही रिल्स व्हायरल केले, कुणी कितीही फोटो वापरले तरी माझा समाज मात्र हुशार आहे. त्यामुळे माझा समाज बरोबर करतो. जे मी लोकसभेला म्हणालो होतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. तेच मी आताच्या विधानसभा निवडणुकीसाठीही सांगितलं आहे, असे जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला एकच सांगणे आहे तुमचं मत वाया जाऊ देऊ नका. तुम्हाला अडीअडचणीत मदत करणाऱ्या उमेदवारालाच तुम्ही मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.