Published on
:
16 Nov 2024, 1:08 pm
Updated on
:
16 Nov 2024, 1:08 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारींची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींवरुन निवडणुक आयोगाने काँग्रेससह भाजपला नोटीस बजावली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना तक्रारीवर सोमवार, १८ नोव्हेंबरपर्यंत औपचारिक उत्तर देण्यात सांगितले आहे. (Maharashtra Assembly Poll)
राहुल गांधींनी निराधार विधाने केल्याची तक्रार
झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी प्रचारादरम्यान काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी निवडणूक संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप ११ नोव्हेंबर रोजी भाजपने दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. भाजपने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, ज्यात त्यांनी महाराष्ट्रात राज्यघटनेबद्दल चुकीची विधाने केल्याचा आणि "राज्यांमध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी" निराधार विधाने केल्याचा आरोप केला आहे. (Maharashtra Assembly Poll)
मोदी-शहांविरोधात काँग्रेसने दाखल केल्या दोन तक्रारी
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसने 13 नोव्हेंबर रोजी तक्रारी केल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत फूट पाडणारी भाषणे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन निवडणूक आयोगाने भाजपचे अध्यक्ष नड्डा यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, भाजप आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना तक्रारीवर सोमवार, १८ नोव्हेंबरपर्यंत औपचारिक उत्तर देण्यात सांगितले आहे.