Published on
:
16 Nov 2024, 11:24 am
Updated on
:
16 Nov 2024, 11:24 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अवघ्या ७२ तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस उमेदवारांना सभा, रॅली आणि बैठकांचा धडाका सुरू राहणार आहे. निवडणुकीचा प्रचार सोमवारी (दि. १८) सार्यकाळी ६ वाजेच्या ठोक्याला थांबवणार आहे.
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नऊ मतदारसंघांत एकूण १८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. सध्या जाहीर सभा, रॅली, कॉर्नर बैठका आदींचा धडाका सुरू आहे. मात्र आता मतदानासाठी केवळ तीन दिवसांचाच वेळ शिल्लक आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी मुदत ही मतदान संपायच्या ४८ तासांपर्यंतच आहे. त्यानुसार जाहीर प्रचार १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. त्यानंतर उमेदवार आणि राजकीय पक्षांना सभा, रॅली, बैठका घेता येणार नाहीत, असे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
ईव्हीएम मशीनच्या सरमिसळीची प्रक्रिया पूर्ण जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत एकूण ३२७३ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यासाठी ईव्हीएम मशीन त्या त्या मतदारसंघात पोहोचविण्यात आल्या असून त्यांच्या सरमिसळीकरणाची प्रक्रिया पार पडली आहे. सर्व मतदारसंघात गरजेपेक्षा २० टक्के अधिक कंट्रोल युनीट आणि बॅलेट युनीट देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ३९१३ कंट्रोल युनीट आणि ७४३० बॅलेट युनीट तसेच ४२३९ व्हीव्हीपॅट मशीन पुरविण्यात आल्या आहेत.
शनिवार, रविवार ठरणार हॉट
मतदानासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यात शनिवार आणि रविवार हे सार्वजनिक सुटीचे दिवसही आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत शहरात बड्या राजकीय नेत्यांच्या सभांचे नियोजन राजकीय पक्षांकडून सुरू आहे. याआधी शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या जाहीर सभा नुकत्याच पार पडल्या ओहत. आता शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही सभा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निरीक्षकांना दिली तयारीची माहिती
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी निवडणूक निरीक्षकांच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. मतदारसंघनिहाय मतदान केंद्र, मतदार यादी, मतदार चिठ्ठी वाटप, निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान केंद्रावर द्यावयाच्या व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था उपाययोजना, मतदार जनजागृतीसाठी राबविलेले उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कुठे किती उमेदवार
सिल्लोड- २४ कञड १६ फुलंब्री - २७ औरंगाबाद मध्य- २४ औरंगाबाद पश्चिम - १८ औरंगाबाद पूर्व - २९ पैठण -१७ गंगापूर - १८ वैजापूर - १०