सोडून गेलेले राजकारण व समाजकारणातून उध्वस्त होतील:शरद पवार यांचा हल्लाबोल, मकरंद पाटलांवरही साधला निशाणा

2 hours ago 1
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून बाहेर गेलेल्या आमदारांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे. जे विचार सोडून जातात व तत्वाला मूठ माती देतात त्यांना गद्दार म्हटले जाते आणि ते राजकारण व समाजकारणातून उध्वस्त होतील, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. ते वाई येथे बोलत होते. सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे आले होते. वाई येथे राष्ट्रवादी पक्ष सोडून अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या मकरंद पाटील यांच्या विरोधात उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सौ. अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारासाठी शरद पवार वाई येथे आले होते. आपल्या भाषणाची सुरुवातच शरद पवार यांनी आपला पक्ष सोडून गेलेल्या मकरंद पाटलांमुळे मला वाई येथे यावे लागले असे सांगितले. माझे सहकारी मला सोडून जाणे हे मला नवीन नाही पण तुम्ही लक्षात ठेवा की सोडून गेलेले निवडून आलेला नाही हा इतिहास आहे आणि वाई येथेही तेच होईल आणि वाई येथील सर्वसामान्य नागरिक याला तेच हवे आहे, असे सांगून शरद पवार यांनी मकरंद पाटील यांच्या पक्ष सोडण्याच्या कृतीवर टीका केली. त्यांच्या वडिलांचा दाखला देऊन ते म्हणाले की आज जर दिवंगत लक्ष्मणराव जाधव पाटील असते तर हे झाले नसते. लाडकी बहीण योजनेवर टीका करताना शरद पवार म्हणाले, केवळ लाडकी बहीण म्हणून चालणार नाही तर आम्ही आमच्या लाडक्या लेकीला सन्मानाने निवडणुकीला उभे करतो हे अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी देऊन आम्ही दाखवून दिले आहे. त्यांना विजयी करून गद्दारांना धडा शिकवा असेही पवारांनी आवाहन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article