Published on
:
16 Nov 2024, 7:38 am
Updated on
:
16 Nov 2024, 7:38 am
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून घोषणांचा पाऊस सुरू आहे. मात्र ‘मनरेगा’तील गायगोठा, विहिरी, रस्ते, शाळा संरक्षण भिंती इत्यादी कामांसाठी निधी नसल्याने जिल्ह्याचे सुमारे 10 कोटी रुपये अडकून पडले आहेत. यात वैयक्तिक लाभाच्या योजनांचे तसेच तुटपुंज्या मजुरीवर काम करणार्यांचे मस्टरचे पैसेही मिळत नसल्याने लाभार्थी पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनेक कामे घेतली जातात. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांसह ग्रामपंचायत स्तरावरून पाणंद रस्ते, सिमेंट रस्ते, शाळा संरक्षक भिंती, वृक्षलागवड अशी अनेक कामे केली जातात. अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र लाभाची रक्कम मिळत नाही. प्रशासनाकडून निधी नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले जात आहेत.
जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी विहिरी, गायगोठ्यांची कामे पूर्ण केली आहेत. गोठ्याचे प्रत्येकी 55 हजार, विहिरीचे 2.5 लाख याप्रमाणे एकूण 3.50 कोटींच्या पुढे अनुदान मिळालेले नाही. दोन महिन्यांपासून लाभार्थी आपल्या अनुदानासाठी पाठपुरावा करत आहे. तर दुसरीकडे पाणंद रस्ते, सिमेंट रस्ते, शाळा संरक्षक भिंती इत्यादी 92 पेक्षा अधिक कामे पूर्ण झालेली असून, त्या मोबदल्याची 6.50 कोटींचा निधी सहा महिन्यांपासून रखडलेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीही हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
मंजुरी 600 कामांची; सुरू किती?
मनरेगातून पाणंद रस्त्यांच्या 25 लाखांपर्यंत गटविकास अधिकारी, तहसीलदार तर 25 लाखांच्या पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी हे प्रशासकीय मान्यता देतात. गत काही महिन्यांत तब्बल 600 पेक्षा अधिक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यापूर्वी झालेल्या कामांचेच पैसे नसल्याने वरील 600 पैकी 400 पेक्षा अधिक कामे सुरूच झालेली नाहीत. जी सुमारे 200 कामे सुरू झाली, तीदेखील केवळ 10 टक्के पूर्ण असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.