विधानसभा निवडणूक 2024Pudhari file photo
Published on
:
16 Nov 2024, 9:42 am
Updated on
:
16 Nov 2024, 9:42 am
निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वच राजकीय पक्ष, त्यांच्या उमेदवारांनी व सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी काटेकोरपणे पालन करावे. विशेषतः अधिकारी व कर्मचार्यांनीही राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान प्रक्रिया निकोप व निर्भय वातावरणात पार पाडावी, असे आवाहन श्रीरामपूर विधानसभा निवडणूक निरीक्षक अरुणकुमार यांनी केले आहे.
ते येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरमध्ये आयोजित मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, विकास नवाळे, कृषी अधिकारी उल्हास राक्षे, संदीप रुद्राक्ष, राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षण देताना किरण सावंत म्हणाले, केवळ मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रामाणिक कर्तव्यामुळे जगात सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारताची निवडणूक यशस्वीरीत्या पार पडत आहे. मतदानाच्या दिवशी गडबड, गोंधळ होऊ न देता सुटसुटीतपणे आणि नियमानुसार मतदान प्रक्रिया राबवावी, मतदान कक्षात गर्दी होवू न देता एकाचवेळी चार-पाच जणांना प्रवेश देण्यास यावा, मतदान अधिकार्यांनी मतदान केंद्रासह 100 मीटर पर्यंत लक्ष देणे आवश्यक आहे. उमेदवारांचा प्रतिनिधी शक्यतो त्याच गावातील असावा म्हणजे मतदारांची ओळख पटवणे सोपे जाईल, मतदान केंद्रात त्यांना मोबाईल आणता येणार आहे, अशा सूचनाही सावंत यांनी दिल्या.
भि.रा. खटोड कन्या विद्यालयात प्रत्यक्ष मतदान यंत्रांची हाताळणीचे यांत्रिक प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान या विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी निवडणुक कर्तव्य राष्ट्रीय कर्तव्य समजून हसत खेळत काम कसे करावे याबाबत प्रबोधन करणारी नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.