निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दल सज्ज असून शस्त्र तस्करांवर पुढे देखील कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्र, अमली पदार्थ विरोधी कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी शस्त्र, अमली पदार्थ तस्करीवर करडी नजर ठेवली आहे.
दरम्यान निवडणूक काळात ठाणे पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत आतापर्यंत 15 पिस्तुल व 28 जिवंत काडतुसे जप्त करीत 11 शस्त्र तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने 5 पिस्तुल व 4 काडतुसे जप्त करून तिघांना गजाआड केले आहे. तर युनिट दोनच्या पथकाने 2 पिस्तुल व 2 काडतुसे जप्त करीत दोघांना अटक केली आहे. तसेच युनिट तीनने 3 पिस्तुल व 7 काडतुसे, युनिट चारच्या पथकाने 2 पिस्तुल, चार काडतुसे व युनिट पाचच्या पथकाने 1 पिस्तूल, 7 काडतुसे जप्त केली आहेत. त्याव्यतिरिक्त खंडणी विरोधी पथकाने 2 पिस्तूल, एक काडतूस तर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने एक पिस्तूल व चार काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाई मोहिमेत 7 लाख 5 हजार रुपये किमतीची शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.