Published on
:
16 Nov 2024, 7:43 am
Updated on
:
16 Nov 2024, 7:43 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जगप्रसिद्ध हेवीवेट चॅम्पियन बॉक्सर माइक टायसन याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला युट्यूबर ते बॉक्सर बनलेल्या २७ वर्षीय जेक पॉलने डल्लास, टेक्सास येथील ब्लॉकबस्टर नेटफ्लिक्स इव्हेंटच्या मुख्य इव्हेंटमध्ये पराभवाचा धक्का दिला. माइक टायसन १९ वर्षानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये उतरला होता. माइक टायसन हा बॉक्सिंग रिंगमध्ये आक्रमक खेळ, आक्रोश आणि त्याच्या वेडेपणासाठी नेहमी चर्चेत राहिला आहे.
पॉलने पहिल्या २ फेरीत मागे पडल्यानंतर जोरदार कमबॅक केले. ही लढत ८ राउंडपर्यंत चालली. नेटफ्लिक्सवर थेट प्रक्षेपित झालेल्या आठ फेरीच्या या लढतीत टायसनपेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या पॉलने ८०-७२, ७९-७३ आणि ७९-७३ अशा गुणांसह हेवीवेट लढत जिंकली.
५८ वर्षीय टायसनला लढतीदरम्यान खूप संघर्ष करावा लागला. माइक टायसनने १६ मिनिटे चाललेल्या लढतीत केवळ १८ अचूक पंच मारले. तर दुसरीकडे जेक पॉलने टायसनपेक्षा चार पट जास्त ७८ अचूक पंच मारले.