डॉ. विजयकुमार गावितसंग्रहित
Published on
:
16 Nov 2024, 7:53 am
Updated on
:
16 Nov 2024, 7:53 am
नंदुरबार | माझ्या घरातील व्यक्तीला काँग्रेसने उमेदवारी द्यावी, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. अमक्याला उमेदवारी द्या, असे मी काँग्रेसला सांगितले नाही. तरीही घराणेशाहीचा माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांच्या एकाच घरातील व्यक्ती सत्तेत कसे, अशा शब्दात महायुती भाजपाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांनी पलटवार केला आहे. नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी आणि रनाळे येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
डॉ. गावित म्हणाले, गावित परिवारातले सदस्य निवडणुकीला उभे राहतात म्हणून ओरड केली जाते परंतु विरोधकांनी हे लक्षात घेतले आम्ही विकासात्मक काहीतरी करू शकतो हा विश्वास जनतेला जनता आमच्या पाठीशी आहे. हे पाहून वेगवेगळे राजकीय पक्षसुद्धा गावित परिवाराबद्दल विश्वास बाळगून आहेत. विरोधकांनी कधी लोकहिताची कामे केली नाहीत. गावित परिवाराच्या विरोधात ओरड करण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच नाही.
मी तीस वर्षात काय विकास केला असा विरोधकांकडून प्रश्न केला जातो. अशा विरोधकांना तीस वर्षात मी केलेली विविध कामे दिसत नसतील तर हे त्यांचे दुर्दैव आहे. आमच्या विरोधातील नेत्यांनी किती कामे करून दाखवली याची तुलना मतदारांनी अवश्य करावी, असेही डॉ. गावित म्हणाले. मी ज्या वेळेला अनुशेषच्या जागा भरत होतो त्या वेळेला मी ओबीसीच्या जागा भरल्या, व्हीजेएनटीच्या जागा भरल्या, दलित बांधवांच्या आदिवासींच्याही जागा भरल्या. ६१ हजार लोकांना नोकऱ्या दिल्या. एसटीच्या ३६ हजार, व्हिजेएनटी १२ हजार तर आदिवासींना २८ हजार नोकऱ्या दिल्या. मी हे अल्पावधीत केले आहे.
दुसरीकडे विरोधकांकडेसुद्धा अनेक वर्षे सत्ता पदे होती. परंतु त्यांच्याकडे इच्छाशक्ती नव्हती. मी गरीब कल्याणाची संकल्पना घेऊन राजकारणात आलो. आजही तीच संकल्पना घेऊन विकास कार्य सुरू आहे, अशा शब्दांत गावित यांनी आपली भावना व्यक्त केली.