उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 10:29 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:29 am
गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील धारावी झोपडपट्टी अदानीला दिलेली नसून डीआरपी तिचा विकास करीत आहे. त्यात सरकारची भागीदारी असून सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (दि. १६) देसाईगंज येथे माध्यमांशी बोलताना दिली.
फडणवीस यांनी आज देसाईगंज येथे भाजप महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गरिबांना घरे द्यावयाची नाहीत. राजीव गांधी असताना त्यांनी धारावीची घोषणा केली होती. त्यानंतर 25 वर्ष काँग्रेसचे सरकार होते. परंतु, धारावीचा कुठलाही विकास त्यांनी केला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. सोबतच धारावीच्या कंत्राटाची प्रक्रिया ही उद्धव ठाकरेंनी पार पाडली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली. काँग्रेसने गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्याचा विकास केला नाही. सरकारने पीक विम्यासाठी आठ हजार कोटी रुपये दिले. महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना 25 हजार रुपये देण्यात येतील आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याचा विचार सरकारचा आहे. नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर त्यांनी महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 14 योजना आणल्या. त्यातील लखपती दीदी ही एक योजना असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पोलिसांनी अत्यंत परिश्रमाने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपवला असून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा संकल्प सरकारने केल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राज्य सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, प्रकाश पोरेड्डीवार, विधानसभा प्रभारी श्रीनिवास, कृष्णा गजबे आदी उपस्थित होते.