Published on
:
16 Nov 2024, 12:12 pm
Updated on
:
16 Nov 2024, 12:12 pm
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने प्रशासन अलर्टमोडवर आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील १ हजार ७५५ मतदान केंद्रांसाठी ३ हजार ५७ बॅलेट युनिट, २ हजार १६४ कंट्रोल युनिट तर २ हजार २३३ व्हीव्हीपॅटची संख्या निक्षित करण्यात आली आहे. जालना मतदारसंघात संख्या वाढल्याने या आकड्यातही फेरबदल होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत मतदान यंत्राची सज्जता केली जात आहे. जिल्ह्यात भोकरदन मतदारसंघात उमेदवारांची संख्या सर्वाधिक ३२ एवही असून नोटामुळे येथे बॅलेट पुनिटची संख्याही तिप्पट होणार आहे. जालना, बदनापूर, घनसावंगी मतदारसंघात डबल तर परतूर मतदारसंघात सिंगल म्हणजे एकच मतदान यंत्र लागणार आहे. प्रशासनाने आवश्यक असलेल्या मतदान यंत्रासह पंत्राची मागणी अगोदरच नोंदवलेली आहे. नोटा या पर्यायासाठी भोकरदन मतदारसंघात अतिरिक्त मतदान यंत्र वाढणार आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत १०९ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक ३२ उमेदवार भोकरदन मतदारसंघात तर सर्वात कमी ११ उमेदवार परतूर मतदारसंघात आहे. त्यामुळे उर्वरित तीन मतदारसंघांत उरलेल्या संख्येनुसार सुरू आहे. पूर्वी पाचही मतदारसंघांतील मतदान केंद्रासाठी निर्धारित मतदान यंत्र लागणार होते. आता नोटमुळे ही संख्या वाढणार आहे. एका यंत्रावर १६ उमेदवारांची नावे बसतात, त्यामुळे भोकरदन मतदार संघातील ३२ उमेदवारांसाठी प्रत्येकी एका मतदान केंद्रावर दोन यंत्र लागणार होते, परंतु नोटा या पर्यायाचे बटन सर्वात शेवटी असल्याने एका केंद्रासाठी आणखी एका यंत्राचा भार पडला आहे.
शिवाय २० टक्के यंत्र राखीव ठेवली जाणार आहे. त्यामुळे मतदान यंत्राचा आकडा फुगण्याची शक्यता आहे. जिल्हा निवडणूक विभागाने अगोदरच बॅलेट युनिटसह ईव्हीएमचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे वाढीव यंत्र जालना जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.