शर्पे येथील तरुणाचा नापणे धबधब्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 2:34 pm
Updated on
:
16 Nov 2024, 2:34 pm
वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा: मित्रांसोबत नापणे धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विक्रम विठोबा नमसे (वय ३०, रा. शेर्पे भट्टवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज (दि.१६) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत विक्रम नमसे हा आपल्या दोन मित्रांसह गोठणे नदीवरील नापाने येथील धबधब्यावर आज दुपारी फिरायला गेला होता. मित्रासमवेत तो धबधब्याच्या वरच्या बाजूला अंघोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. त्याला पोहताही येत नव्हते. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याचा बूडून मृत्यू झाला.
विक्रम आपल्या आई वडिलांसमवेत शेर्पे येथे राहत होता. आई -वडील आजारी असून तो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तर त्याचा एक भाऊ कामानिमित्त मुंबई येथे राहतो. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, अजय बिलपे, उद्धव साबळे, महिला पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
नापणे धबधबा हा बारमाही वाहणारा धबधबा म्हणून सुप्रसिद्ध आहे. या धबधब्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ सुरू असते. या धबधब्यावर यापूर्वीही अशाप्रकारे पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. धबधब्यावर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून उपाय योजना करणे आवश्यक आहे. आनंद लुटताना पर्यटकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.