Published on
:
16 Nov 2024, 2:35 pm
Updated on
:
16 Nov 2024, 2:35 pm
नवी दिल्ली: आता काळ बदलला असून दहशतवाद्यांना स्वत:च्या घरातही सुरक्षित वाटत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता शेजारील देशासह जगाला कडक शब्दांत संदेश दिला. ते म्हणाले की, शेजारील देशांनी पुरस्कृत केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे लोकांना स्वतःच्या घरात आणि शहरात असुरक्षित वाटत होते. मात्र, आता दहशतवाद्यांनाच असुरक्षित वाटते. राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण काढत हे वक्तव्य केले. यावेळी ते म्हणाले की, हे शतक भारताचे आहे. लोकांकडून, लोकांसाठी, लोकांची प्रगती हा नव्या आणि विकसीत भारताचा मंत्र असल्याचे ते म्हणाले.
ऑक्टोबर १९४७ मध्ये काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाल्याची बातमी वाचल्यानंतर प्रत्येक नागरिकासारखाच मलाही आनंद झाला होता. असे पंतप्रधान म्हणाले. मात्र, त्यानंतर काश्मीरला सात दशके हिंसाचारात अडकवले गेले. आता जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे. निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत ही आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले.
जेव्हा देशात आणीबाणी लादली गेली तेव्हा काही लोकांनी गृहीत धरले होते की आता आणीबाणी कायम राहील. त्यावेळी भारतातील नागरिक उभे राहिले आणि आणीबाणी उलथून टाकली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सामान्य माणसाच्या सामर्थ्याचे वर्णन करताना, त्यांनी कोविड साथीच्या रोगाविरूद्ध लढा देण्यासाठी सामान्य नागरिकांचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, १० वर्षांपूर्वी भारतात एवढ्या मोठ्या बदलांची अपेक्षा कोणीही केली नव्हती. हे शतक भारताचे शतक असेल, असे ते म्हणाले. सरकार प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी वेगाने काम करत आहे. उत्पादन, बांधकाम, शिक्षण किंवा मनोरंजन अशा सर्व क्षेत्रात भारताचा जागतिक दर्जा तयार होणार असल्याचे ते म्हणाले. भारत विकासाचा हा वेग कायम ठेवेल आणि लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.