Published on
:
16 Nov 2024, 5:26 am
Updated on
:
16 Nov 2024, 5:26 am
पालघर : पालघर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडी व मनसे अशा प्रमुख पक्षांकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र काही मतदारसंघांमध्ये जिजाऊ विकास पार्टीच्या अपक्ष उमेदवारांसह इतर अपक्ष उमेदवारांचा फटका प्रमुख लढतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका चुरशीच्या व रंगतदार होणार असल्याचे चित्र पालघर जिल्ह्यात आहे.
पालघर जिल्ह्यात जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार उभे असले तरी प्रामुख्याने विक्रमगड विधानसभेमध्ये शिवसेनेशी बंडखोरी केलेले त्यानंतर जिजाऊमध्ये दाखल झालेले विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांना त्रासदायक स्थितीला सामोरे जावे लागत आहे. प्रकाश निकम यांना विक्रमगड मतदारसंघांमध्ये चांगला कौल असल्यामुळे ते भाजपसह शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला चांगलेच आव्हान देताना दिसत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची चांगलीच रेलचेल आहे व प्रमुख लढतीच्या उमेदवारांची ते डोकेदुखी ठरत आहेत.
डहाणू विधानसभा मतदार संघात कल्पेश भावर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असून जिजाऊ प्रणित असलेले ते उमेदवार आहेत. त्यामुळे सामाजिक कामाच्या जोरावर जिजाऊ कडे पाहून त्यांना मतदान होण्याची शक्यता लक्षात घेता त्याचा फटका भाजपसह माकपला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार एडवोकेट विराज गडग हे महाविकास आघाडीचे जयेंद्र दुबळा यांची मते मिळवणार असल्यामुळे जयेंद्र दुबळा यांना या निवडणुकीत मते मिळवणे आव्हानात्मक ठरणार आहे.
बोईसर विधानसभा मतदार सघात अपक्ष उमेदवार नरेश थोडी यांची चांगलीच हवा असून त्यांना चांगली मते मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिजाऊने बोईसरमध्ये केलेल्या सामाजिक कार्याचा फायदा नरेश धोडी यांना मतांच्या माध्यमातून होणार असून महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडीच्या मतांमध्ये यामुळे घट होणार आहे. त्यामुळे त्यांना मते मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. नालासोपारा मतदार संघामध्ये काँग्रेसमार्फत उभे असलेल्या संदीप पांडे यांना उत्तर भारतीय मतांच्या ध्रुवीकरणासाठी रिंगणात उभे करण्यात आले असून त्यांना उत्तर भारतीय मते मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा फटका महायुतीच्या भाजपाला बसण्याची चिन्हे आहेत.
याचबरोबर प्रहार जनशक्तीचे धनंजय गावडे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्यामुळे त्यांचा थेट सामना भाजप व बहुजन विकास आघाडीशी असणार आहे. धनंजय गावडे हे चांगले चर्चेत असून त्यांना मिळणारी मते भाजप व बहुजन विकास आघाडीला पिछाडीला नेऊ शकतात. वसई विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभे असले तरी त्याचा फारसा फटका प्रमुख पक्षांना बसण्याची चिन्हे नाहीत.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, डहाणू, पालघर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत उमेदवार देण्यात आले आहेत. येथील कार्यकर्त्यांनी त्यांना मते मिळण्यासाठी जीवाचे रान करून सोडले आहे. मनसे उमेदवारांना मते मिळाल्यास त्याचा थेट फायदा महायुतीला होणार आहे. तर महाविकास आघाडीच्या पारड्यातील मतांचे बळ कमी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार यांच्यासह मनसेचे उमेदवार हे प्रमुख लढतीतील उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसून येते.