जुने कौलारू तहसील व त्याच्या शेजारील पोलिस ठाण्याचे पडीत कार्यालय प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भग्नावस्थेत पाहायला मिळत आहेPudhari News Network
Published on
:
16 Nov 2024, 7:09 am
Updated on
:
16 Nov 2024, 7:09 am
मुरबाड शहरः किशोर गायकवाड
मुरबाड शहराच्या मध्यभागी स्थित ऐतिहासिक वारसा लाभलेले जुने कौलारू तहसील व त्याच्या शेजारील पोलिस ठाण्याचे पडीत कार्यालय प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भग्नावस्थेत पाहायला मिळत आहेत. परिणामी, या वास्तूंच्या आवारात अक्षरशः उकिरडा पसरल्याचे चित्र नजरेस पडत आहे. तर देखभाल, दुरुस्ती अभावी या वास्तूंची पूर्णपणे दुरवस्था झालेली दिसत आहे. मुरबाडचे तहसिलदार किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने या वास्तूंची स्वच्छता व डागडुजी करून तेथे ऐतिहासिक संग्रहालय उभारावे अशी नागरिकांची मागणी प्रलंबित आहे.
सन 1864 साली ब्रिटिशांनी या कार्यालयांची प्रशासकीय कारभारासाठी उभारणी केली होती. सन 1942 साली देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय असलेले स्वातंत्र्य सैनिक वीर भाई कोतवाल व त्यांच्या सहकार्यांना पकडण्यासाठी तत्कालीन डी.वाय.एस.पी. हॉल यांनी मुरबाड पोलीस ठाण्यातून कुमक नेली होती. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांना मुरबाड येथील तहसीलदार कार्यालयात व त्याच्या शेजारी असलेल्या पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या सहवासाने पावन झालेल्या वास्तूंचे नाते थेट भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी आहे. ज्यादिवशी भारत देश स्वतंत्र झाला त्यारात्री 12 वाजता याच तहसील कार्यालयात मुरबाडचे स्वातंत्र्य सैनिक दगडूशेट शहा यांनी तिरंगा ध्वज फडकावून मानवंदना दिली होती. त्यामुळे या दोन्ही वस्तूंना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे.ही दोन्ही कार्यालये ऐतिहासिक असल्याने त्याठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे नवीन बांधकाम करता येत नाही. केवळ देखभाल व दुरुस्ती करण्याची परवानगी आहे.
ब्रिटीशकालीन ऐतिहसिक वास्तू भग्नावस्थेत पहायला मिळत आहे. Pudhari News Network
मात्र आता दोन्ही ऐतिहासिक वास्तूंची पडझड झाली असून या वास्तूचे रूपांतर कचरा डेपोमध्ये होतांना पाहायला मिळत आहे. त्यातच मुरबाड पोलिसांनी या इमारतीच्या सभोवताली अपघातामध्ये जप्त केलेल्या गाड्यांचा ढिगारा रचून ठेवला आहे. या वास्तू पाडून त्या ठिकाणी मुरबाड तहसिलदार कार्यालय व पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचे प्रशासनाने ठरविले होते. परंतु ठाणे जिल्हाधिकार्यांनी याकामी परवानगी नाकारल्याने मुरबाड पोलीस ठाण्याची इमारत शेजारील जागेत बांधण्यात आली. तर तहसिलदार कार्यालय औद्योगिक क्षेत्रात नवीन इमारत बांधून त्यामध्ये हलविण्यात आले. तसेच येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या उगळे आळी येथील स्टेट बँकेची शाखा सुध्दा कालांतराने बाजारपेठ बाहेरील सोनार पाडा भागात हलविल्यामुळे मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातून मुरबाड शहरात येणारे लोक परस्पर औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊ लागले आहेत. याचा परिणाम म्हणून मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील मुख्य बाजारपेठ निम्म्याहून अधिक ओस पडली आहे. एखादी वास्तू ऐतिहासिक असली की त्या ठिकाणी संग्रहालय उभारून संबंधित इतिहास प्रसिद्ध व्यक्तींच्या आठवणींचा संग्रह करून त्याला एक वेगळेच स्वरूप प्राप्त करून देणे अभिप्रेत असते. त्यानुसार मुरबाड येथील जुने तहसिलदार कार्यालय व पोलीस ठाणे या वास्तूंमध्ये योग्य ती सुधारणा व दुरुस्ती करून त्याठिकाणी संग्रहालय तयार करण्याचा मनोदय जाहीर करण्यात आला होता. परंतु त्या गोष्टीला चालना मिळाली नाही व सुस्थितीत असलेले तहसीलदार कार्यालय आज कोणीही लक्ष देत नसल्याने कचर्याचा निव्वळ उकिरडा झाला.
जुन्या तहसिलदार कार्यालयाची वास्तू तहसिलदार कार्यालयाच्या ताब्यात आहे. मात्र या इमारतीची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.
अभिजीत देशमुख, तहसिलदार मुरबाड
न्यायदालनाच्या निवार्यात उकिरडा...
या दोन्हींही वास्तू ऐतिहासिक असतांना प्रशासनाने त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने या वास्तूंचा चक्क उकिरडा बनला आहे. सद्यस्थितीला या कार्यालयांवर गवत, पालापाचोळा व रानवेळींचा आच्छादन निर्माण झाले असून याच्या मागील परिसराचा लघुशंका विसर्जनासाठी सर्रास वापर होत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना याच न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालयात हजर करण्यात आले होते.
ही जुनी कार्यालये दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी फार मोठा खर्च येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शासनाने निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे या वस्तूची देखभाल व दुरुस्ती करता येत नाही.
रोहन गाडे, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांंधकाम विभाग, मुरबाड