निवडणुकीनंतर वंचित सत्तेसोबत जाणार:प्रकाश आंबेडकर यांचे सूतोवाच; म्हणाले - महायुतीसह महाविकास आघाडीचाही पर्याय खुला
3 hours ago
1
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी निवडणुकीच्या निकालानंतर वंचित सत्तेसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. यावेळी त्यांनी राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याचा अंदाजही व्यक्त केला. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या 20 तारखेला एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. तूर्त राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला अवघे 2 दिवस शिल्लक असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेसोबत जाण्याचे संकेत दिलेत. सत्तेसोबत जाणे महत्त्वाचे वाटते प्रकाश आंबेडकर शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कुणीही कुठेही जाऊ शकते. आम्हालाही सद्यस्थितीत पाहता सत्तेसोबत जाणे महत्त्वाचे वाटते. आमच्यापुढे निवडणूक निकालानंतर महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसोबत जाण्याचे पर्याय खुले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या अनेक बैठका महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झाल्या होत्या. आंबडेकर स्वतः शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याशी बोललेही होते. पण अचानक त्यांच्यात वितुष्ट आले आणि वंचितने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बहुतांश मतदारसंघात आपले उमेदवार दिलेत. त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचाही आरोप होतो. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीनंतर सत्तेसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. यामुळे त्यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. 'बटेंगे तो कटेंगे'चाही घेतला समाचार प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या मुद्याचाही समाचार घेतला. भाजपकडे विकासाचा कोणताच मुद्दा उरला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठीच त्यांच्याकडे बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणांचा वापर केला जात आहे, असे ते म्हणाले. आंबेडकरांनी यावेळी माध्यमांवर वंचितकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्याचाही आरोप केला. हे ही वाचा... विधानसभेला गंमत करू नका नाही तर जंमत होईल:अजित पवार यांचे बारामतीकरांना आवाहन; म्हणाले - कुणात किती धमक याचा विचार करा पुणे - लोकसभा निवडणुकीसारखी या निवडणुकीत गंमत करू नका, नाही तर तुमची जंमत व्हायची, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला या विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करताना म्हटले आहे. शरद पवारांनी दीड वर्षांनंतर आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तुमचे कोण काम करणार? कुणात काम करण्याची धमक आहे? याचा विचार करा, असेही ते यावेळी म्हणाले. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)