अमरावतीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. (Image source- X)
Published on
:
16 Nov 2024, 10:00 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:00 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांच्या बॅग तपासणीवरून राजकीय वाद सुरु आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती येथे दाखल झालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी अमरावतीच्या धामणगाव येथील हेलिपॅडवर ही तपासणी केली.
याचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात अधिकारी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करत आहेत. यावेळी राहुल गांधी शेजारी उभे असलेले दिसतात. त्यानंतर तपासणी चालू असताना राहुल गांधी तेथून निघून गेले आणि ते पक्षाच्या नेत्यांसोबत व्यस्त असल्याचे दिसले.
काँग्रेस नेते राहुल गांधी झारखंड दौऱ्यावर असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने उड्डाणासाठी परवानगी दिली नव्हती. सर्व प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या असताना राहुल गांधींचे हेलिकॉप्टर का थांबवले?, असा सवाल काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली. तर आज शनिवारी राहुल गांधी यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आरोप केला आहे की, राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्याची परवानगी न मिळाल्याने त्यांना सभास्थळी पोहोचण्यास उशीर झाला अथवा त्या रद्द कराव्या लागल्या.
ठाकरे, पवार, फडणवीस यांच्याही बॅगांची तपासणी
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बॅगांची सोमवारी निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी तपासणी केली होती. यानंतर या दोन्ही नेत्यांनी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी तपासाव्यात, असे आव्हान दिले होते. त्यानंतर मराठवाड्यात निवडणूक प्रचारासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बॅगचीही निवडणूक आयोगाच्या पथकाने बुधवारी तपासणी केली होती.
महाराष्ट्रात राहुल गांधींच्या बॅग तपासणीची पहिलीच वेळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगची रत्नागिरीतील दापोलीत हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली. शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची किमान दोनदा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. दरम्यान, महाराष्ट्रात राहुल गांधींच्या बॅगची तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.