कामा रुग्णलयामध्ये मागील दोन वर्षांपासून गर्भधारणा मधुमेहाबाबत अभ्यास सुरू. file photo
Published on
:
16 Nov 2024, 5:16 am
Updated on
:
16 Nov 2024, 5:16 am
मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणावामुळे मधुमेहाचे वाढत आहे. सर्वच वयोगटातील व्यक्तींना मधुमेहाचा प्रमाण धोका वाढत असताना गरोदरपणामध्ये महिलांमधील हार्मोन्समधील बदलामुळे त्यांना मधुमेहाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे कामा रुग्णालयाने केलेल्या अभ्यासामधून समोर आले आहे.
गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये होत असलेल्या मधुमेहाची सामान्यपणे कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. गर्भावस्थेतील मधुमेह हा हार्मोनल बदलांमुळे होतो. शरीर अन्नाचे उर्जेमध्ये रुपांतरित करते. इन्सुलिन नावाचा संप्रेरक अन्नातून साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतो. पण इन्सुलिन योग्य काम करत नसल्यास किंवा शरीरात पुरेसे इन्सुलिन नसल्यास रक्तात साखर मोठ्या प्रमाणात तयार होऊन मधुमेह होतो. गर्भधारणेदरम्यान, नाळेतील हार्मोन्स इन्सुलिनच्या कार्यपद्धतीत व्यत्यय आणतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होऊन गर्भधारणा मधुमेह होतो. हा मधुमेह सामान्यतः गर्भधारणेच्या २४ ते २८ आठवड्यांच्या दरम्यान दिसून येते. यामुळे गर्भधारणेत गुंतागुंत होण्याची शक्यता निर्माण होते. गर्भधारणेदरम्यान गर्भधारणेचा मधुमेह कोणालाही होऊ शकतो. मात्र हृदयरोग, उच्च रक्तदाब, गर्भधारणेपूर्वी लठ्ठपणा किंवा जास्त वजन असणे, टाईप २ मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांना गर्भधारणेचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.
कामा रुग्णलयामध्ये मागील दोन वर्षांपासून गर्भधारणा मधुमेहाबाबत सुरू असलेल्या अभ्यासातून गर्भावस्थेत मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान कामा रुग्णालयामध्ये ३ हजार १५५ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये १२९ महिलांमध्ये गर्भधारणा मधुमेह झाल्याचे आढळून आले. तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान १५८ महिलांमध्ये गर्भधारणा मधुमेह झाला असल्याचे आढळून आले आहे.
महिलेला गर्भधारणा मधुमेह झाल्यास बाळामध्ये जन्मतः हृदय दोष, अपरिपक्व फुफ्फुसे, सामान्यपेक्षा जास्त लाल रक्तपेशी निर्माण होऊन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, काही प्रकरणांमध्ये बाळांच्या आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होतात, जन्मतःच बाळ लठ्ठ असणे, मुलांमध्ये फेफरे येणे, अकाली जन्म, बाळाला टाईप २ चा मधुमेह होण्याचा धोका आदी समस्यांचा बाळाला सामना करावा लागतो.