Published on
:
16 Nov 2024, 5:19 am
Updated on
:
16 Nov 2024, 5:19 am
नरेश कदम, मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीबरोबर तिसरी आघाडी लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक निर्णायक ठरत आलेली आहे. शेकापसह डावे पक्ष आता काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी जन्माला आली असून हा फॅक्टर किती निर्णायक ठरणार हे महत्त्वाचे आहे.
2014 पूर्वीच्या निवडणुका बघितल्या तर राज्याच्या विधासभा निवडणुकीत शेकापच्या पुढाकाराने तिसरी आघाडी ही उभी राहत असे, पण निवडणुका पार पडल्यावर ही तिसरी आघाडी ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वळचणीला जात असे. मात्र शेकापसह डावे पक्ष आता काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी कुठे, कुठे प्रभावी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम हे वेगवेगळे लढले, पण तिसर्या आघाडीच्या रूपात लोकसभा निवडणुकीत उभे होते. त्यांना जनतेने फारसा प्रतिसाद दिला नाही. ज्या मुस्लिम आणि दलित मतांच्या विभाजनाची अपेक्षा वंचित आणि एमआयएमकडून असते. तसे मतांचे विभाजन झाले नाही. लोकसभेचे मोठे मतदारसंघ असतात. त्यामुळे मोठ्या कॅनव्हासवर त्यांचा परिणाम झाला नाही. राजू शेट्टी यांची शेतकरी संघटनेची ताकद घटली आहे. ते स्वतः लोकसभा निवडणुकीत पडले. ते तिसर्या आघाडीत असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार पाडतील अशी स्थिती नाही.
संभाजी राजेंचा प्रभाव नाही!
मराठवाड्यात अजूनही जरांगे फॅक्टर आहे, पण लोकसभा निवडणुकीइतका महायुतीला फटका बसणार नाही. तिसरी आघाडी आणि वंचितचे फारसे अस्तित्व नाही. छत्रपती संभाजीनगर, नांदेडमध्ये एमआयएम मात्र या दोन जिल्ह्यात महाविकास आघाडीला त्रासदायक ठरेल. संभाजी राजे हे तिसर्या आघाडीत सामील झालेले असले तरी पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्यामुळे कुठे फारसा फरक पडेल असे दिसत नाही. मुंबई, ठाण्यासह पूर्ण कोकणात तिसरी आघाडी आणि वंचित, एमआयएमचे उमेदवार आहेत. यात एमआयएमचे भायखळा, वर्सोवा, भिवंडी, वांद्रे पूर्व आणि पश्चिम येथील उमेदवार काँग्रेस आणि ठाकरे गटाला अडचणीचे ठरू शकतील.
विदर्भात तिसर्या आघाडीची दिसतेय ताकत
महायुती आणि महाआघाडी यांच्यातील संघर्ष हा घासून आहे. त्यामुळे तिसरी आघाडी किंवा वंचित, एमआयएमने पाच-सहा हजार मते घेतली तरी महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो. तिसर्या आघाडीची ताकद ही विदर्भात दिसत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात तिसर्या आघाडीचे एक घटक बच्चू कडू आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे या भागात प्राबल्य आहे. त्यामुळे या भागातील महाआघाडीच्या उमेदवारांना मतविभाजनाचा फटका बसू शकतो. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि मूर्तिजापूर या दोन जागेवर त्यांचे उमेदवार निवडून येतील, अशी अनुकूल स्थिती आहे. बाळापूर येथे काँग्रेसमधून आलेले माजी आमदार नतिकोद्दीन खतीब हे वंचितकडून लढत असून या मुस्लिमबहुल मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार त्यामुळे अडचणीत आहे. पूर्व विदर्भात काँग्रेस आणि भाजप अशीच लढत आहे.