प्रहारचे अमरावती विधानसभेचे उमेदवार डॉ. सय्यद अबरार यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना पाठिंबा दिला. Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 7:58 am
Updated on
:
16 Nov 2024, 7:58 am
अमरावती, पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा जोर कायम असताना प्रहारला अमरावतीत धक्का बसला आहे. प्रहारचे अमरावती विधानसभेचे उमेदवार डॉ. सय्यद अबरार यांनी निवडणुकीतून माघार घेत काँग्रेस उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रहार प्रमुख बच्चू कडू यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे अमरावतीतील राजकीय समीकरण देखील बदलणार आहे. डॉ.अबरार यांनी शुक्रवारी (दि.१५) डॉ.सुनील देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचत त्यांना पाठिंबाचे पत्र दिले. या पाठिंब्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद असताना प्रहार मध्ये नाराजी आहे. हा निर्णय डॉ. अबरार यांचा व्यक्तिगत असल्याचे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत सांगितले. या संदर्भात बच्चू कडू लवकरच भूमिका जाहीर करतील असे देखील ते म्हणाले.
दरम्यान, डॉ. अबरार यांनी आपल्या पाठिंबाच्या पत्रामध्ये शहरातील संभ्रम दूर करण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष पक्षाला विधानसभेत मजबूत करण्यासाठी आपण विचारपूर्वक काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. हा पाठिंबा देताना माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत आदी उपस्थित होते.