Published on
:
16 Nov 2024, 10:39 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:39 am
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : 'ठीक आहे, आमचे तुमचे थोडे मतभेद असतील, त्यासाठी माझ्याशी कोणी बोलायला तयार असेल तर मीही त्यांच्याशी बोलायला तयार आहे. आता आपण सर्व मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकूया, ही संधी आहे', असे म्हणत शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सिल्लोड येथील सभेत थेट भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांना मदतीसाठी साद घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सिल्लोड येथे शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ उध्दव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ठाकरे यांनी युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना चक्क येथील भाजप नेते, कार्यकत्यांनाच साद घालत मदतीचे आवाहन केले.
वास्तविक पाहता उध्दव ठाकरे आणि भाजप यांच्यातूनही विस्तवही जात नाही, अशी राजकीय परिस्थिती झालेली आहे. ठाकरे हे भाजपला एक नंबरचा शतू मानतात, हे कुणीही नाकारू शकत नाही. दरम्यान, सिल्लोड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते काम करीत असून ते आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना छुपी मदत करत असल्याचे बोलल्या जाते. हाच धागा धरत ठाकरे यांनी भाजप कार्यकत्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारसाठी मदतीचे आवाहन केले. ठाकरे म्हणाले, गेल्या निवडणुकीत मंत्री सत्तारांना पक्षात घेऊन चूक केली. ती चूक सुधारण्यासाठी पुन्हा तुमच्या मतदारसंघात आलो आहे. शिवसेनेची मशाल आता घराघरांत पेटली आहे.
आम्ही सत्तेत येताच सत्तारांच्या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सत्तारांचे कारनामे माहीत असते तर पक्षात प्रवेश दिलाच नसता. सत्तेचा गैरवापर करून जनतेची जमीन, प्लॉट हडपले. तसेच व्यापाऱ्यांना त्रास दिला. सभेतील गर्दी सत्तारांच्या पराभवाची नांदी असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सभेला शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, खा. डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, द्वारकदास पाथ्रीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू राठोड, सुनील मिरकर, पदमाकर इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, दिलीप मचे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुलकुमार ताठे, पदाधिकारी उपस्थित होते.
पंधराशे काय खिशातून देताय का?
आमचे सरकार असताना सोयाबीनला सात हजार भाव होता, आता आहे का तितका?. नाही ना, आमचे पुन्हा सरकार आल्यानंतर मी तुम्हाला सोयाबीनला सात हजारांचा हमीभाव देईल, असे अश्वासनही यावेळी ठाकरे यांनी दिले. अडीच वर्षांत कधी त्यांना कधी त्यांची बहीण आठवली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण, लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहात, हे पैसे शिंदे तुम्ही तुमच्या वडिलांच्या खिशातून नाही आणत, ते माझ्या शेतकऱ्याच्या खिशातील आहेत. तुम्ही पंधराशे काय देता, आम्ही तीन हजार देणार आहोत, असेही ठाकरे म्हणाले.