Published on
:
16 Nov 2024, 3:30 am
Updated on
:
16 Nov 2024, 3:30 am
गडहिंग्लज ः हसन मुश्रीफ यांंचे हात बरबटलेले होते म्हणूनच त्यांना ईडीची भीती वाटली. मलाही ईडीची नोटीस आली होती. मात्र आम्ही स्वच्छ असल्याने ईडीला घाबरलो नाही. ईडीने त्यांची फाईल बंद केली नसून केवळ कपाटात ठेवली आहे. अल्पसंख्याक असल्याने त्यांना मंत्रिपदाच्या अनेक संधी दिल्या. मात्र त्यांनी जनतेशी बेईमानी करत भाजपच्या पंक्तीला जाऊन बसणे पसंत केले. अशा मुश्रीफ यांना पाडलेच पाहिजे, असे तीनदा आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गडहिंग्लजच्या सभेत आपला रोख स्पष्ट केला. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले.
गडहिंग्लज येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी सुखी नाही, युवकांना नोकर्या नाहीत. मोदींना लोकसभेत 400 पार जागा हव्या होत्या. त्या कशासाठी हव्यात ते जनतेला कळाले म्हणूनच लोकसभेत मोदींना काठावर पास व्हावे लागले. लोकसभेचा धडा घेऊन महायुतीच्या सरकारने लोकांना फसवण्यासाठीच योजना राबवल्या आहेत. आगामी काळात सामाजिक ऐक्याला धक्का बसू नये यासाठी आम्ही एकत्र येऊन लढत असून त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा.
सत्ता चुकीच्या पद्धतीने वापरल्यानेच ईडीची धाड
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू महाराजांच्या ऐतिहासिक धोरणाला अनुसरून लहान समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व तर त्यांना दिलेच; याशिवाय राज्याच्या मंत्रिमंडळात तीनदा संधी दिली. त्यांना मिळालेली सत्ता लोकांसाठी न वापरता चुकीचा वापर केल्यानेच ईडीची धाड पडली. महाराष्ट्राला लढणार्यांची गरज असताना त्यांनी साथ देण्याऐवजी साथ सोडली. मुश्रीफांच्या घरी धाड पडल्यावर त्यांच्या भगिनींनी आम्हाला गोळ्या घाला म्हणत धाडस दाखवले होते. यांनी मात्र घाबरून भाजपच्या पंगतीत जाण्याचा निर्णय घेतला. कागल मतदारसंघातील जनता स्वाभिमानी आहे, खोट्या गोष्टींना साथ देणार नाही. म्हणूनच कागलमधून समरजित घाटगे यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला हवा : खा. शाहू महाराज
अध्यक्षस्थानावरून बोलताना खा. शाहू महाराज यांनीही कागल व महाराष्ट्रात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र खंडणीमुक्त, भ—ष्ट्राचारमुक्त करायला हवा. पुरोगामी आहे असे म्हणणारे शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार सोडून गेले, असेही त्यांनी मुश्रीफांचे नाव न घेता स्पष्ट केले.
भानगडी करण्यात ते एक्सपर्ट : समरजित घाटगे
समरजित घाटगे म्हणालेे, पवारांना बाप मानणार्याने पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली. या गद्दाराला गाडण्याची वेळ आली असून आजवर त्यांना ज्यांनी मदत केली त्या सर्वांच्या पाठीत त्यांनी खंजीरच खुपसला आहे. निवडणुकीत अखेरच्या चार-पाच दिवसांत भानगडी करण्यामध्ये ते एक्सपर्ट असून सर्वांनी सतर्क राहावे, असेही आवाहन केले. यावेळी स्वाती कोरी, आर. के. पोवार, अनिल घाटगे, संजय पवार, शिवाजी खोत, किसनराव कुराडे, डॉ. प्रकाश शहापूरकर, अभिषेक शिंपी यांनी मनोगते व्यक्त केली.