Published on
:
16 Nov 2024, 5:31 am
Updated on
:
16 Nov 2024, 5:31 am
रायगडमधील सात विधानसभा मतदार संघातील निवडणुकीने चांगलाच जोर धरला आहे. अन्य मतदार संघांच्या तुलनेत श्रीवर्धनमधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विद्यमान आमदार तथा मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अनिल नवगणे आणि अपक्ष राजेंद्र ठाकूर हे रिंगणात आहेत. तटकरे परिवाराच्या प्रचार झंझावातापुढे त्यांचाही प्रचार जोरात सुरु आहे. परिणामी येथील लढत चूरशीची होणार आहे.
श्रीवर्धन मतदार संघातील पॅटर्नला 18 वर्षे होऊन गेली आहेत, आणि त्या वेळच्या मतदारसंघाची रचना देखील बदलली आहे. अगदी सुरुवातीपासूनचा इतिहास पाहिला तर बॅरिस्टर ए.आर. अंतुले, रवींद्र राऊत यांच्या वेळेला श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर 1995 साली शिवसेनेचे शाम सावंत या ठिकाणी विजयी झाले. आणि त्यानंतर सलग 2004 सालापर्यंत या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी होत होता. परंतु त्यावेळी नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यामुळे त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तळ कोकणापासून ते संगमेश्वर मतदारसंघापर्यंत राजीनामा दिलेले सर्व आमदार काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते.
श्रीवर्धन मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्यानंतर श्याम सावंत यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळेला मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन या जुने संस्थांन असलेल्या तीन तालुक्यांचा मतदारसंघ अस्तित्वात होता. त्यावेळेला या मतदारसंघांमध्ये एक 1,74,479 मतदार होते. तर त्या वेळेच्या पोटनिवडणुकीत 67.87 टक्के मतदान झाले होते. म्हणजेच उभ्या असलेल्या उमेदवारांना 1,18, 323 मते पडली होती. तर उर्वरित मते बाद झाली होती. या निवडणुकीत एकसंघ असलेल्या शिवसेनेचे उमेदवार तुकाराम सुर्वे यांना 61,995 मते पडली होती, तर काँग्रेसचे उमेदवार श्याम सावंत यांना 46,240 मते पडली होती.
त्यावेळी अली कौचाली यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना या वेळेला 10,0 75 मते मिळाली होती. तर तुकाराम सुर्वे 15,755 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर 2009 च्या सार्वत्रिक विधानसभेच्या अगोदर मतदार संघाची पुनर्रचना झाल्यामुळे रोहा माणगाव मतदार संघ रद्द करण्यात आला. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या 193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीवर्धन, म्हसळा, तळा हे तीन तालुके पूर्ण, तर रोहा शहर व रोह्याचे एक मंडळ, तर माणगावमधील एक मंडळ श्रीवर्धन मतदार संघात सामील करण्यात आले.
2009 च्या निवडणुकीत देखील सुनील तटकरे यांच्यासमोर तुकाराम सुर्वे हे उमेदवार उभे होते. परंतु त्यावेळी तुकाराम सुर्वे यांचा सरळ सरळ पराभव करीत सुनील तटकरे हे विजयी झाले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेचे रवी मुंडे यांचा केवळ 77 मतांनी निसटता पराभव झाला होता. तर सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून 77 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी आत्ताच्या विद्यमान आ. आदिती तटकरे यांनी विनोद घोसाळकर यांचा चाळीस हजार मतांनी पराभव केला होता.
त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघातील काही लोकांचा समज झाला आहे की, एका ठराविक समाजाचा उमेदवार उभा केला की तो विजयी होईल. पण आता जनता सुज्ञ झालेली आहे. समाज बघून कोणीही मतदान करत नाही. या ठिकाणच्या सुज्ञ जनतेला विकास हवा आहे. या अगोदर 2006 सालच्या पोटनिवडणुकीमध्ये तुकाराम सुर्वे याचा विजय झाला. त्यामुळे तुकाराम सुर्वे यांच्या विजयाचा पॅटर्न व सध्याची बदललेली राजकीय परिस्थितीमध्ये खूप फरक झालेला आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील जनता सातत्याने विकासाला मतदान करित आली आहे. जातीयवादाला येथील मतदार थारा देणार नाही. मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास आणि रोजगाराच्या संधी याला प्राधान्य मतदारांना अपेक्षीत आहे.
आदिती तटकरे यांनी महाआघाडीत तसेच महायुतीत मंत्री म्हणून काम करताना मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य दिले. मूलभूत गरजांबरोबरच पर्यटन वाढीला प्रोत्साहन देणे ,दिघी पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून रोजगाराची संधी आदी सुविधाही निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्याचा दावा महायूतीचा आहे.खा. सुनील तटकरे यांनी देखील केलेल्या विकास कामांचा फायदा आदिती तटकरे यांना होईल असा दावा राष्ट्रवादी जनांचा आहे.