नाशिक मध्य मतदारसंघातील वसंत गिते, नाशिक पश्चिममधील सुधाकर बडगुजर यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. pudhari
Published on
:
16 Nov 2024, 3:24 am
Updated on
:
16 Nov 2024, 3:24 am
नाशिक : महाराष्ट्राचे उद्योग, पाणी गुजरातला पळविणाऱ्यांना, महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला गुजरातचरणी वाकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतं देऊ नका. या महाराष्ट्र द्रोह्यांना मत म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी ठरेल, अशा शब्दांत महायुतीवर हल्लाबोल करताना आमच्या उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या भाजपने हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून समोरासमोर लढावे, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधून दिले. भाजपच्या इशाऱ्यावर शासकीय यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरू आहे. आम्ही माणुसकी मानणारे आहोत, षंड नाही. सुडाने वागायचे ठरले तर दहापट पुढे जाऊ. आमचे सरकार आल्यावर सर्व पापं खोदून काढू, एकेकाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.
नाशिक मध्य मतदारसंघातील वसंत गिते, नाशिक पश्चिममधील सुधाकर बडगुजर यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या खास ठाकरे शैलीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. 'मोदी, शाह म्हणतात उद्धव बाबू राममंदिर क्यो नही गये. राममंदिर गळ रहा है. वो गळणे का थांबेगा तो मै जाऊंगा', अशा शब्दांत खिल्ली उडवत महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही, ठाकरे गॅरंटी चालते, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी इतकेच प्रेम ऊत जात असेल तर दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अल्पसंख्याक आयोगावर आंबेडकरांच्या बौद्ध समाजाचा प्रतिनिधी का घेतला नाही, असा सवाल करत वापरा आणि फेका ही भाजपची नीती असल्याचे ठाकरे म्हणाले. लोकसभेत लोकांनी लाथा घातल्या म्हणून यांना लाडक्या बहिणी आठवल्या. लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यास शिवसैनिक समर्थ आहेत. ही माझ्या अस्तित्वाची लढाई नाही. जनेतेचा हात जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे आहे. बडगुजर आणि त्यांच्या मुलांचा छळ केला जात आहे. आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेचे मतदान असलेल्या भागात मतदान संथ करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर मिलिंद नार्वेकर, खा. शोभा बच्छाव, खा. राजाभाऊ वाजे, उमेदवार वसंत गिते, सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागूल, बबन घोलप, दत्ता गायकवाड, शरद आहेर, गजानन शेलार, डॉ. डी. एल. कराड आदी उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाचा रिमोट कंट्रोल काँग्रेसच्या हाती गेल्याची टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तुम्हालाच शिवसेनेचे रिमोट कंट्रोल हाती घ्यायचे होते. गेल्या २५ वर्षांच्या युतीच्या काळात आम्ही ते तुमच्या हाती येऊ दिले नाही तर काँग्रेसच्या हाती कसे जाऊ देणार, असा सवाल करताना गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले कारण यांना महाराष्ट्र लुटायचा होता, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्रिपदाचा शब्द का मोडला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चांगले शब्द वदवून दाखवा, असे आव्हान पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते. यावर ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तुमचे वर्गमित्र नव्हते. ते हिंदुहृदयसम्राट होते. त्यांना आधी सन्मानाने बोलायला शिका. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला राहुल गांधी यांनी अभिवादन केले होते, अशी आठवण सांगताना तुमचे प्रेम खरे होते तर मुख्यमंत्रिपदाचा बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द का मोडला, कठीण काळात साथ देणाऱ्या शिवसेनाला संपवायला का निघालात, असा सवाल ठाकरे यांना शाह यांना केला.
नाशिककरांच्या प्रेमाला, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मी पोकळ आश्वासन देत नाही. जे करता येणे शक्य आहे तेच बोलतो. आणि जे बोलतो ते करून दाखवतो. मी काही देवेंद्र फडणवीस नाही. ते नाशिकला दत्तक घेणार होते. परंतु त्यांनी नाशिककरांना वाऱ्यावर सोडत गद्दारांना डोक्यावर घेतले. मी तसे करणार नाही. मी नाशिकचा विकास करून दाखवणार, असे ठाकरे यांनी ठासून सांगितले.