रत्नागिरी : वाटद येथील सभेला मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक, तर त्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत.pudhari photo
Published on
:
16 Nov 2024, 1:05 am
Updated on
:
16 Nov 2024, 1:05 am
रत्नागिरी : गाड्या भाड्याने घेऊन वाटद पंचक्रोशीतील तरुणांचे कोट्यवधी रुपये कोणी बुडवले? त्यांना आता धडा शिकवा, असे आवाहन ना. सामंत यांनी यावेळी केले. रत्नागिरीत गेल्या दोन-तीन महिन्यांत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार्या घटना घडल्या त्यामागे नुकताच उबाठा पक्षात प्रवेश केलेल्या व्यक्तीचा हात असल्याचा गंभीर आरोप ना. सामंत यांनी केला.
वाटद जिल्हा परिषद गटाची महायुतीची जाहीर प्रचार सभा गुरुवारी खंडाळा येथे पार पडली. यावेळी ना. सामंत यांनी शक्तीप्रदर्शन केले. हजारो शिवसैनिकांनी सभेला गर्दी केली होती. मैदान प्रचंड भरलेले होते. प्रत्येक महिलेच्या हातात मुख्यमंत्र्यांसह ना. उदय सामंत यांच्या फोटोचे बॅनर होते. वृद्ध महिलांची संख्या सर्वाधिक होती. फटाक्यांच्या आतषबाजीत ना.सामंत यांचे वाटदवासियांनी स्वागत केले. यावेळी व्यासपिठावर माजी जि.प.सदस्य बाबूशेठ पाटील, सुदेश मयेकर, महायुतीचे भाजपचे जिल्हा समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन, भाजपा तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, राष्ट्रवादीचे युवा नेते बंटी वणजू, शांताराम मालप, प्रकाश रसाळ, वरवडे सरपंच विराग पारकर, माजी सभापती ऋतुजा जाधव, मेघना पाष्टे, प्रकाश साळवी, विष्णू पवार, सुधीर वासावे, शरद चव्हाण, प्रथमेश गवणकर, योगेंद्र कल्याणकर, भाई जाधव आदी उपस्थित होते.
जाहीर सभेत बोलताना ना.सामंत म्हणाले, बुधवारी येथेच एक मेळावा झाला. पदाधिकारी, माणसं जमतील म्हणून दोन तास येऊन खंडाळ्याच्या फाट्यावर थांबलेले होते. नंतर तो मेळावा सुरू झाला.माझ्यावर त्यांनी तोंडसुख घेतलं. मी अनेकवेळा सांगितलंय की, माझ्या मतदारसंघात येवून ज्यावेळी तुम्ही माझ्यावर जहरी टीका कराल त्याच्या दुसर्या दिवशीच हे चित्र असे दिसेल. माझ्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मला सभेसाठी थांबाव लागत नसल्याचे ना.सामंत म्हणाले.(Maharashtra assembly poll)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली. तुमच्यापर्यंत पोहोचवली. त्याचा फायदा नक्की माझ्या महिला भगिनींना मिळतो; पण तो फायदा मिळाल्यानंतर ज्यांनी हा फायदा मिळवून दिला त्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही हजारोंच्या संख्येने जमलाय त्याबद्दल तुम्हाला मनापासून मला धन्यवाद द्यायचे आहेत असे ना. सामंत यांनी सांगितले. हि योजना कोणीही बंद करू शकत नाही असे ना.सामंत यांनी सांगितले.
उबाठाच्या पक्षप्रमुखांची रत्नागिरीत झालेली सभा ही दोन मतदारसंघाची होती. म्हणजे 5 लाख मतदारांची ती सभा होती. ही सभा फक्त 30 हजार लोकांच्या जिल्हा परिषद गटाची सभा आहे. त्याला हजारो मतदार उपस्थित आहेत. त्याच्यामुळे सभा नक्की कुठची मोठी झाली. हे मला सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही उपस्थित राहूनच दाखवून दिले आहे, असे ना.सामंत म्हणाले.
मी पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. यापुर्वी तुम्हीच मला आशिर्वाद देवून विधानसभेत पाठविले आहे. आपण मला एवढी ताकद दिली, एवढे आशीर्वाद दिले की आता महाराष्ट्रातील एका जिल्हा परिषद गटाची सभा ही पाच हजाराची होऊ शकते हे तुमच्या सगळयांचे आशीर्वादाने मी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवू शकलो. माझी स्पर्धा कुणाबरोबर नाही. येऊन जे माझ्यावर भाषण करून जातात त्यांना तर मी जमेत पण धरत नाही तर तुमचा मला अभिमान आहे. माझा प्रचार करण्यासाठी मला माझे कुटुंबातले सहकारी पुरे आहेत.(Maharashtra assembly poll)
माझ्या मतदारसंघांमध्ये गेले तीन महिने जे राजकारण झालं ते खरोखरच मनाला वेदना देणारं राजकारण आहे. रत्नागिरीच्या एमआयडीसी मध्ये गाईच्या वासराचा मुंडक मिळालं, त्याच्यानंतर एका महिला भगिनीवर अत्याचाराची घटना घडली, कोकण नगरमध्ये संघाचे संचलन निघाले, या ठिकाणी जे काय प्रकार घडले ते मी घडवले अशा पद्धतीचा सांगण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला; पण माझा तुमच्यावर विश्वास होता. नियतीवर विश्वास होता जो हे सगळं घडवत होता जी व्यक्ती हे सगळं घडवत होती. ती त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दुसर्या पक्षात गेली. विधानसभेचे तिकीट घेतलं असा गौप्यस्फोट ना.सामंत यांनी केला.
20 नोव्हेंबरला होणार्या मतदानामध्ये एक नंबरला धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणा समोरच बटन आपण सगळ्यांनी मिळून दाबावं आणि या वाटद जिल्हा परिषद गटाने 10 हजाराचं विक्रमी मताधिक्य आपल्याच कुटुंबातल्या उदयला मिळवून द्यावं, असे आवाहन ना. सामंत यांनी केले.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराला रंगत येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारार्थ वाटद-खंडाळा येथे आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर गुरुवारी पालकमंत्री तथा स्थानिक आमदार, महायुतीचे उमेदवार ना.उदय सामंत यांनी एका वाटद जिल्हा परिषद गटात विक्रमी गर्दीची सभा घेऊन महाविकास आघाडीला उत्तर दिले आहे. तब्बल पाच हजारहून अधिक शिवसैनिक एका गटाच्या सभेला उपस्थित राहिल्यामुळे ना. सामंत यांनी केलेले शक्तिप्रदर्शन यशस्वी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती.