>>मंगेश दराडे
गेली दहा वर्षे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार अतुल भातखळकर करत आहेत. वाहतूककोंडी, झोपडपट्टय़ांचा रखडलेला पुनर्विकास, अपुरा पाणीपुरवठा असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने रहिवासी अक्षरशः बेजार झाले आहेत. त्यामुळे विजयी हॅट्ट्रिक करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भातखळकरांना रहिवाशांच्या नाराजीच्या मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा विभागात रंगली आहे.
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात मालाड पूर्व, काठियावाडी चौक, रहेजा टाऊनशिप, अशोक नगर, राम नगर, हनुमान नगर, ठाकूर कॉम्प्लेक्स, पोयसर, कांदिवली लोखंडवाला आदी भागांचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण 2 लाख 86 हजार 898 मतदार आहेत, त्यापैकी 1 लाख 56 हजार 580 पुरुष तर 1 लाख 30 हजार 313 महिला मतदार आहेत. केवळ पाच तृतीयपंथी मतदार आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या अतुल भातखळकर यांनाच पुन्हा एकदा भाजपने संधी दिली. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार कालू बुधेलिया आणि मनसेकडून महेश फरकासे निवडणूक लढवत आहेत.
गुजराती, उत्तर भारतीयांची मते निर्णायक
कांदिवली पूर्व मतदारसंघात उत्तर भारतीय त्यापाठोपाठ गुजराती-मारवाडी मतदारांची संख्या अधिक आहे. तिसऱ्या क्रमांकावर मराठी मतदार आहेत. काँग्रेसने येथून मारवाडी समाजाच्या कालू बुधेलिया यांना संधी दिली आहे. त्यांना गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांचा मोठा पाठिंबा मिळतोय. शिवसेनेमुळे मराठी मतदारांची मतेदेखील त्यांच्या पारडय़ात पडतील असे चित्र आहे. कालू बुधेलिया यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला असून मतदारांच्या भेटीगाठीदरम्यान ते त्यांच्या समस्या समजून घेत आहेत.
अपुरा पाणीपुरवठा, रखडलेले एसआरए प्रकल्प
पोयसर भाजीवाडी येथील पिण्याचा अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे रहिवासी त्रस्त आहेत. पावसाळय़ात हनुमान नगर येथील नाला ओव्हर फ्लो होऊन रहिवाशांच्या घरात पाणी शिरते. लोखंडवाला ते ठाकूर व्हिलेजला कनेक्ट करणाऱ्या रोडचे काम अपूर्णावस्थेत आहे. अपना नगरमधील 1200 रहिवासी गेल्या तीन ते चार वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत आहेत. हनुमान नगर आणि पोयसर येथील झोपडपट्टीचा पुनर्विकासाचे भिजत घोंगडे कायम आहे.