Published on
:
16 Nov 2024, 1:17 am
Updated on
:
16 Nov 2024, 1:17 am
सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार सभा, बैठकांचा धडाका सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांचे दौरे वाढल्याने जिल्ह्यात राजकारण तापले आहे. जाहीर प्रचारास आता अवघे तीन दिवस उरले आहेत. जिल्ह्यात विधानसभेच्या आठही मतदारसंघात निवडणूक प्रचार मोठ्या चुरशीने होत आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा फिवर जोरात आहे. प्रचार सभा, बैठका तसेच प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवर आणि शहरांमध्ये प्रत्येक प्रभागात घर टू घर प्रचार जोरात आहे. उमेदवारांनी जाहीर सभांसह पदयात्रा, कोपरा सभांवर भर देत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न चालविला आहे. राज्यपातळीवरील नेतेमंडळींच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार सभांनी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले.
शरद पवार हे तासगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. ते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरसले. महाराष्ट्राची सत्ता फडणवीस यांच्या हाती जाऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी आपला पवित्रा स्पष्ट केला. महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्यावरही टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी पेठ (ता. वाळवा) येथे होते. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर शरसंधान साधले. वाकुर्डे योजनेसाठी जयंत पाटील यांनी पंधरा वर्षात फुटकी कवडीही दिली नसल्याचा आरोप केला. महायुतीची सत्ता आल्यास वाकुर्डेचे सर्व टप्पे पूर्ण करू, शेतकर्यांचा ‘सात-बारा’ कोरा करू, अशी घोषणाही त्यांनी केली.