Published on
:
16 Nov 2024, 3:38 am
Updated on
:
16 Nov 2024, 3:38 am
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | मुख्यमंत्रिपद हे माझ्यासाठी गौण आहे. राज्यामध्ये महायुतीला २०१९ पेक्षाही मोठे यश मिळणार आहे. भाजपच्याही जास्त जागा निवडून येतील. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, अशा कार्यकर्त्यांच्या भावना असणे स्वाभाविक आहे. आघाडी वा महायुतीचे राजकारण हे वास्तवावर आधारित असते. तिथे भावनेला प्राधान्य देता येत नाही. घटक पक्षांना सोबत घेऊन जायचे असताना आमच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतीलच, असे नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून विविध तर्कट मांडले जात आहेत. तसेच उलटसुलट फॉर्म्युलेही मांडले जात आहेत. त्यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी अलीकडेच मुख्यमंत्रिपदाबाबत एखाद्या नव्या चेहऱ्याचाही विचार होऊ शकतो, असे विधान केल्याने चर्चाना सुरुवात झाली. शिवाय, महायुतीत मुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार, त्यासाठी कोणता फॉर्म्युला असणार याचीही चर्चा सुरू आहे. या चर्चावर भाष्य करताना फडणवीस यांनी वरील मत व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात २०१९ला आमच्या १०५ जागा आल्या. आता त्याहीपेक्षा आमच्या जास्त जागा येतील. त्यापेक्षा कमी येणार नाहीत. विदर्भातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी कोणाताही फॉर्म्युला ठरलेला नाही. जास्त जागा, स्ट्राइक रेट असा कोणताही निकष ठरलेले नाहीत. निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांचे अध्यक्ष एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील. शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे आहेत. तर, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे. भाजपमध्ये असे निर्णय संसदीय मंडळाकडून घेतले जातात. त्यासाठी संसदीय मंडळ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह काही नेत्यांवर जबाबदारी सोपविते. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दोन्ही मित्रपक्षांचे अध्यक्ष एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
पक्षाने विश्वास दाखवला हे महत्त्वाचे
लोकसभेच्या निवडणुकीत मी राज्याचे नेतृत्व करीत होतो. त्यात महाराष्ट्रात अपयश आले. मात्र त्यानंतरही पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवत विधानसभा निवडणुकांची जबाबदारी माझ्यावर टाकली. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, अशी पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची भावना असणे स्वाभाविक आहे. मात्र, वस्तुस्थितीही पाहायची असते, असे स्पष्ट उत्तर फडणवीस यांनी दिले.