J. P. NaddaPudhari News Network
Published on
:
16 Nov 2024, 3:51 am
Updated on
:
16 Nov 2024, 3:51 am
नाशिक : 2014 मध्ये जेव्हा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले, तेव्हा देशातील राजकारणाची परिभाषा बदलली. २०१४ अगोदर देशात 'अँटीइन्कम्बन्सी' असे बोलले जात होते, मात्र आता 'प्रो-इन्कम्बन्सी' (Pro incumbency) हा शब्द रूढ झाला आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपचे सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सरकार आले असून, महाराष्ट्रातही तिसऱ्यांदा महायुतीचे सरकार येईल, त्यामुळे महाराष्ट्रात अँटीइन्कम्बन्सी नसून, प्रो-इन्कम्बन्सी असल्याचे सिद्ध होईल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.
सिडको येथील संभाजी स्टेडियमजवळील श्रीतेज गार्डन येथे आयोजित उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. भारती पवार, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रदीप पेशकार, लक्ष्मण सावजी, आशिष नहार आदी उपस्थित होते. नड्डा म्हणाले, काँग्रेसने देशात जातीयवाद, भ्रष्टाचार, परिवारवाद, फोडा आणि राज्य करा अशी नीती अवलंबत राज्य केले. मात्र २०१४ नंतर देशात राजकारणाची परिभाषा बदलली असून, पंतप्रधान मोदी यांनी देशाला जबाबदार सरकार दिले. आज मोदी सरकार गरीब, वंचित, दलितांचे सरकार म्हणून पुढे येत आहे.
काँग्रेसी राजकारणामुळे देशहित धोक्यात
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताचा लौकिक वाढत आहे. जागतिक स्तरावरील असे कुठलेच व्यासपीठ नाही, ज्या ठिकाणी भारताला सदस्यत्व नाही. जी-२० मध्ये भारत काय करू शकतो हे सबंध जगाने बघितले आहे. ब्रिक्समध्येही भारत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत एक मोठा पर्याय म्हणून पुढे येत आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर जातात, तेव्हा पीओके, दहशतवाद या मुद्द्यांवर बोलत नाहीत. कारण हा आमचा अंतर्गत विषय असून, तो हाताळण्यास आम्ही सक्षम असल्याचे ते दाखवून देतात, तर पंतप्रधान मोदी एआय, सेमीकंडक्टर या विषयांवर बोलताना दिसतात. या उलट काँग्रेसने देशहित न बघता निव्वळ राजकारण करीत देशाला मागे ढकलल्याचा घणाघातही नड्डा यांनी यावेळी केला.