यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, भगवान शंकर, माता पार्वती, गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी हे एकाच परिवारातील आहेत. आपल्या देशात जेथे जेथे कार्तिक स्वामींची मंदिरे आहेत. तेथे तेथे हा कार्तिक पौर्णिमेचा उत्सव उत्साहाने या दिवशी साजरा होत आहे. भाविक कार्तिक स्वामींना मोरपीस अर्पण करतात, मोर हे कार्तिक स्वामींचे वाहन आहे, जसे मोरपिसात विविध रंग असतात, आपल्या जीवनात येणारे सुख- दुःखाचे विविध रंग देखील आपल्याला कार्तिक स्वामींच्या दर्शनाने शोभिवंत करायचे आहेत, म्हणूनच कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे कार्तिक पौर्णिमेला महत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी येथील घाटावर गंगास्नान करून प्रवरामाईला दिवे अर्पण केले. यावेळी देवगड घाटावर ही मोठी गर्दी झाली होती. कार्तिक पौर्णिमा असल्याने भाविकांनी कार्तिक स्वामींना प्रिय असलेला मोरपीस त्यांचे दर्शन घेऊन अर्पण केला. पहाटेपासून सुरू झालेल्या भाविकांच्या गर्दीने दुपारच्या सत्रात वेग घेतला होता. मंदिराच्या प्रांगणात विविध स्टॉल लावण्यात आल्याने कार्तिक पौर्णिमा उत्सवानिमित्ताने देवगड नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.