ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सरकारनं चालू केली आहे. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचे एकूण सात हाफ्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हाफ्ता देखील लवकरच जामा होण्याची शक्यता आहे. दरम्यान लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष तयार केले आहेत, मात्र या निकषात बसत नसताना देखील अनेक महिलांकडून या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सरकारकडून अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे.
ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांचा हाफ्ता बंद होण्याची शक्यता आहे. बाकीच्या लाभार्थी महिलांसाठी ही योजना चालूच राहणार आहे. मात्र तरी देखील या योजनेबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली. यावर पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?
यासंदर्भात अनेकदा माध्यमांमार्फत माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजना गेल्या जुलैपासून सुरू झाली. जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून वेगवेगळ्या स्तरावर या योजनेचं क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात देखील या योजनेत काही डिफॉल्टर्स आढळून आले. जो लाभार्थी या योजनेत बसत नाहीत त्यांना वगळण्यात आलं आहे.
ज्यांनी दोन दोनदा या योजनेसाठी अर्ज केला आहे. किंवा जाच्याकडे चार चाकी गाडी असेल त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येईल. दर महिन्याला या योजनेच्या निकषात बदल होत असतो. उदहरणार्थ समजा दोन महिन्यांपूर्वी एखाद्या लाभार्थी महिलेकडे चार चाकी नव्हती, मात्र आता ती आहे. त्यामुळे या योजनेचं क्रॉस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. या योजनेचे जे काही निकष आहेत, ते शासन निर्णयामध्ये निगमित केलेले आहेत. त्यानुसार ही सर्व प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ज्या महिला निकषात बसत नाही, त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.