प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अडचणीत आला आहे. सोनू सूदच्या विरोधात पंजाबच्या लुधियाना ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट रमणप्रीत कौर यांनी अटक वॉरंट जारी केलं आहे. कोर्टात साक्ष देण्यासाठी सोनू सूदला वारंवार बोलावण्यात आलं होतं. अनेक नोटिसा पाठवूनही सोनूने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच त्याच्या अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता सोनू सूद काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याप्रकरणी लुधियानातील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीच्या विरोधात 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खटला दाखल केला आहे. त्यात नकली रिजिका नाण्यात गुंतवणूक करण्यासाठी लालच देण्यात आल्याचा आरोप आहे. वकील राजेश यांनी या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यात फसवणूक केल्याचाही आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
या तक्रारीमुळे वकील राजेश खन्ना यांनी सोनू सूद यांना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावलं होतं. परंतु, वारंवार समन्स पाठवूनही सोनू सूद कोर्टात साक्षीसाठी आला नाही. सोनू गैरहजर राहत असल्यानेच कोर्टाने आता सोनूच्याच अटकेचं वॉरंट काढलं आहे.
10 तारखेला सुनावणी
हे वॉरंट मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आलं आहे. यात सोनूला अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणाची पुढची सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, टीव्ही9शी सोनू सूदने संवाद साधला. हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. या प्रकरणाशी माझं काहीच घेणंदेणं नाही, असं सोनूने म्हटलंय.
सोनू काय म्हणाला?
मी कोणत्याही गोष्टीचा ब्रँड अम्बेसेडर नाहीये. मी वकिलाला यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे. 10 फेब्रुवारी रोजी पुन्हा उत्तर देईन. मला एवढंच सांगायचं की, मी कोणत्याच गोष्टीचा ब्रँड अम्बेसेडर नाहीये. या प्रकरणाची मला गंधवार्ताही नाही. माझं या प्रकरणाशी काही घेणंदेणंच नाहीये. फक्त या प्रकरणात पब्लिसिटी करायची आहे, म्हणून या गोष्टी होत आहेत, असंही तो म्हणाला.