लातूर (Latur):- बऱ्याच राजकीय विजनवासानंतर लातूर जिल्ह्यासाठी लवकरच राजकीय दुग्ध शर्करा योग येण्याची चिन्हे आहेत. दोन राष्ट्रीय पक्षांची प्रदेशाध्यक्षपदे आणि दोन मंत्रीपदे जिल्ह्याला मिळण्याची शक्यता असून त्या दृष्टीने लातूरकर नेते मंडळी मुंबईत (Mumbai) तळ ठोकून बसले आहेत.
दोन पक्षांची प्रदेशाध्यक्षपदे आणि दोन मंत्रीपदे जिल्ह्याला लाभण्याची शक्यता
काँग्रेसच्या (Congress)प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh)यांची तर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी संभाजीराव पाटील निलंगेकर यांची वर्णी लागणार, अशी चर्चा राजकीय गोटात जोरदार चालू आहे. इतकेच नव्हे, तर पक्षश्रेष्ठींकडून तातडीने मुंबई गाठण्याचा आदेश आल्यानंतर अमित देशमुख मुंबईला (Mumbai) रवाना झाले असून संभाजीराव पाटील निलंगेकरही मुंबईतच तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मावळत्या मंत्रिमंडळातील क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चिन्हे असून लातूरमध्ये देशमुखांना चेकमेट देण्यासाठी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपा मंत्रिमंडळात संधी देण्याची शक्यता आहे.
क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चिन्हे
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेस(Congress) पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी उसळी पक्षातील अनेक नेत्यांनी मारल्याने अखेर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे विशेष म्हणजे विजय यांनी पटोले यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताबाबत दुसरा दिल्याने व लातूरमध्ये असलेल्या माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांना पक्षश्रेष्ठीकडून तातडीने मुंबईला येण्याची सूचना आल्याने प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा अधिक गडद झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती अस्वास्थ्य असतानाही अमित देशमुख यांनी पक्ष आदेश येतात मुंबईकडे कूच केली आहे. सध्या मुंबईत पक्षाच्या बैठका सुरू असून या बैठकांमधून पक्ष कोणत्या निर्णयाप्रत येतो, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. एक तरुण चेहरा व राज्यातील काँग्रेसजनांमध्ये चैतन्य निर्माण करणारे नेतृत्व असल्याने अमित देशमुख यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी पक्ष देईल, असा दावा काँग्रेसजन करीत आहेत.
पाटील निलंगेकर यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळू शकते
दुसरीकडे माझी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळू शकते. काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते. निवडणुकीच्या काळात प्रचार सभेसाठी आल्यानंतर भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी संभाजीराव पाटील यांना मंत्रिपद मिळेल, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची इच्छा असल्याने व दुसरीकडे भाजपाला तगडे मराठा नेतृत्व प्रदेशाध्यक्ष रूपाने हवे असल्याने निलंगेकर यांचा चेहरा प्रदेशाध्यक्ष म्हणून समोर आल्याची चर्चा होत आहे.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपा नेतृत्वाने तातडीने मुंबईला बोलावले
लातूर मधून निसटता पराभव झालेल्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपा नेतृत्वाने तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. याचाच अर्थ चाकूरकर घराण्याचा सन्मान भाजपाकडून होणार अशी चर्चा लातूरमध्ये सुरू आहे. 2004 मध्ये लोकसभेला पराभूत झाल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांना काँग्रेस नेतृत्वाने दिल्लीला बोलावून घेत देशाचे गृहमंत्रीपद दिले होते, हा इतिहास लातूरमध्ये पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या रूपाने लिहिला जाईल व अर्चनाताई पाटील यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संधी मिळेल व रमेशआप्पा कराड यांच्या जागी विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी शक्यता लातूरमध्ये भाजपा समर्थक करीत आहेत.